esakal | धुळ्यातील कोट्यवधींच्या विकासकामांचा मार्ग झाला मोकळा !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यातील कोट्यवधींच्या विकासकामांचा मार्ग झाला मोकळा !

आदिवासी विकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे चौकशी अहवाल हाती लागेपर्यंत मंत्र्यांनी कामांना स्थगिती दिली होती. ती उठविल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे

धुळ्यातील कोट्यवधींच्या विकासकामांचा मार्ग झाला मोकळा !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

 धुळे ः ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत जिल्ह्यात सुमारे पाच कोटी ४७ लाखांच्या निधीतून विविध विकासकामे प्रस्तावित होती. यासंदर्भात विश्‍वासात न घेतल्याने साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित नाराज होत्या. त्यांनी एकूणच कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आदिवासी विकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे चौकशी अहवाल हाती लागेपर्यंत मंत्र्यांनी कामांना स्थगिती दिली होती. ती उठविल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आदिवासीबहुल साक्री आणि शिरपूर तालुक्यात ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत विविध विकासकामांचा प्रस्ताव सादर झाला. याकामी सुमारे साडेसात कोटींवर निधी मंजूर झाला. त्यासाठी काँक्रिट रस्ते व आनुषंगिक विकासकामांचे प्रस्ताव मागविले. मात्र, साक्री तालुक्यातील कामे सुचविताना यंत्रणेने विश्‍वासात घेतले नाही, असा आमदार सौ. गावित यांचा नाराजीचा सूर होता. शिवाय जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीचे गटनेते पोपटराव सोनवणे यांनी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत कामांच्या स्थितीवर आक्षेप घेतला. 

सोनवणे यांचा आक्षेप 
योजनेतील कामे ग्रामस्थांच्या मागणीनुसार नाही, तर ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे होतात. सरपंचासह ग्रामपंचायतींचे ठरावही घेतले जात नाहीत. संगनमताने तयार झालेले ठराव गटविकास अधिकारी तपासत नाही. पूर्वीच्याच ठिकाणी पुन्हा काँक्रिट ओतण्याचे प्रकार घडतात, असा श्री. सोनवणे यांचा आक्षेप होता. याअनुषंगाने आमदार गावित यांनी आदिवासी विकासमंत्र्यांकडे तक्रार केली. यात साक्री तालुक्यातील काही कामांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिफारस दिली. ते जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी काही कामांना शिफारस दिल्याचे सांगण्यात आले होते. विश्‍वासात न घेता ही प्रक्रिया राबविल्याने आमदार गावित नाराज झाल्याची चर्चाही होती. 

स्थगिती उठविली 
या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्र्यांनी तक्रारीनुसार जुलैमध्ये साक्री तालुक्यातील सुमारे साडेपाच कोटींच्या निधीतील विविध कामांना स्थगिती दिली होती. ज्या गावांचे प्रस्ताव आहेत, तेथे पूर्वी कामे झाली आहेत किंवा कसे, याबाबत नियोजन समिती सचिव तथा जिल्हाधिकाऱ्यांसह आदिवासी प्रकल्प विभागाला चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यावेळी नियमानुसार कामे मंजूर असून, मंत्र्यांच्या निर्देशानुसार चौकशी अहवाल पाठविला जाईल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी मांडली होती. त्यानुसार चौकशी अहवाल सादर झाला. नंतर आदिवासी विकासमंत्र्यांनी कामांबाबत स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सरासरी ७ कोटी ८० लाखांची कामे मार्गी लागली आहेत. 


शिरपूरचा निधी वर्ग 
ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत शिरपूर तालुक्यातील प्रस्तावित कामांबाबत कुठलीही हरकत नसल्याने सुमारे दोन कोटी तीन लाखांवर रकमेचा निधी पूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग झाला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे