
आम्हाला अफगाणिस्तान येथे घबाड सापडले असून त्यात आमच्या हिश्शाला ४.३ मिलियन डॉलर आले आहेत. आमच्या हिश्शातील ३० टक्के रक्कम आम्ही पाठवितो
धुळे ः समाजाला शिक्षित करण्याचा वसा घेणारे गुरूजी भूलथापा, फसवणुकीपासून अपप्रकारांपासून सावध राहा, असे सांगत असतात. मात्र, एक गुरूजी मोहात अडकून घबाडाच्या लालसेने साडेतीन लाख रुपये गमावून बसला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस केंद्राकडे तक्रार झाली आहे.
आवश्य वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय; छापा पडला आणि सत्य समोर आले !
अफगाणिस्तानमध्ये घबाड सापडले असून ते पाहिजे असेल तर साडेतीन लाख रुपये पाठवा, असे महाठकाने सांगताच गुरुजी मोहात पडले आणि त्यांनी चक्क साडेतीन लाख रुपये पाठविले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुरुजींनी सायबर पोलीस केंद्र गाठले. तेथे त्यांनी दोन संशयितांविरुद्ध तक्रार दिली.
मोबाईलर संर्पक साधला
शहरातील वलवाडी शिवारात जिल्हा क्रीडा संकुल परिसरात गुरव सोसायटी आहे. तेथे शिक्षक संजय शेनपडू देसले (वय ४७) वास्तव्यास आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की १३ ऑगस्ट २०२० ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत गरिमा देशमुखसह दोघांनी मोबाईलव्दारे देसले यांच्याशी संपर्क साधला.
आवर्जून वाचा- सामान्य कुटुंबातील चौघा भावंडांचे एकच ध्येय; त्यांचा ‘मेडिकल’चा वाटेवरील प्रवास !
असा घडला प्रकार..
आम्हाला अफगाणिस्तान येथे घबाड सापडले असून त्यात आमच्या हिश्शाला ४.३ मिलियन डॉलर आले आहेत. आमच्या हिश्शातील ३० टक्के रक्कम आम्ही पाठवितो असे सांगून त्यांनी एक बॉक्स पार्सल ब्रिटिश एअरवेज, वर्ल्ड कार्गो या कंपनीमार्फत कुरिअर केल्याचे भासविले. त्यासाठी पावतीचा फोटो व त्यात नोटांचे बंडल पॅक करतानाचे व्हिडिओ शिक्षक देसले यांच्या ई-मेलवर पाठविले. संशयित गरिमा देशमुख हिने मी मुंबई येथील कस्टम अधिकारी बोलत असून तुमच्या नावाने अफगाणिस्तानमधून एक पार्सल आले असून ते सोडविण्यासाठी तीन लाख २७ हजार रुपये बँकेत भरणा करा, असे सांगितले. त्यानुसार देसले यांनी रक्कम भरली. मात्र, ते पार्सल मिळालेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षक देसले यांनी इलियास मायकेल आणि गरिमा देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तपास करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे