esakal | चोरटे म्हणाले "आम्हीच पुढे' 
sakal

बोलून बातमी शोधा

चोरटे म्हणाले "आम्हीच पुढे' 

चोरटे म्हणाले "आम्हीच पुढे' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : देवपूर वलवाडी शिवार व महिंदळे येथील दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी त्या- त्या पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुस्तावलेल्या पोलिसांना चोरट्यांनी "आम्ही जागे" असल्याची पुन्हा सलामी दिली आहे. 
शहरातील देवपूर वलवाडीत शिवारात निताबाई नेमीचंद पाटील (वय 29) यांचे अक्षय कॉलनीतील प्लॉट क्रमांक 15 मध्ये निवासस्थान आहे. पाटील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. काल मध्यरात्रीनंतर ते घरी परतले, त्यावेळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी दरवाजाबाहेरील लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा व मुख्य लाकडी दरवाजाचा कडी कापून आत प्रवेश केला. घराच्या पहिल्या मजल्यावर बेडरुममधील कपाट फोडले. कपाटातील चार तोळ्याची सोन्याच्या पट्टीची माळ, सात हजारांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती, 25 हजारांची रोकड असा एकूण 1 लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला. सोन्याची आजच्या बाजार भावाची किंमत लक्षात घेतल्यास चोरट्यांनी दोन लाखांचा मुद्देमाल नेला. 

सीसीटीव्हीत चार चोरटे कैद 
पाटील कुटुंबीय घरी आल्यानंतर आज पहाटे पश्‍चिम देवपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरातील सीसीटीव्ही छायाचित्रण पाहिले असता त्यात चार चोरट्यांनी घरफोडी केल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. निताबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. हवालदार शेख तपास करीत आहेत. 

महिंदळेला 47 हजाराचा ऐवज लंपास 
महिंदळे येथील मिनाई कॉलनीत शिवणकाम करणारे सविता अधिकार पाटील (वय 38) यांचे वास्तव्य आहे. 30 नोव्हेंबरला ते बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. काल (ता.1) सकाळी सातच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून 40 हजारांची रोकड, 12 ग्रॅमची सोन्याची मंगलपोत असा एकूण 47 हजारांचा ऐवज लंपास केला. मंगलपोतची किंमत आजच्या बाजारभावानुसार 45 हजारांवर असून एकूण 80 हजारावर ऐवज चोरट्यांनी नेला. याप्रकरणी सविता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. 

चोरटे पुन्हा सक्रिय 
शहरासह जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चोरटे पुन्हा सक्रिय झालेले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही त्यावर प्रतिबंध करण्यास किंवा गस्त वाढवून चोरट्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत असून पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.