esakal | पोलिस निरीक्षकाच्याच घरी चोरट्यांनी साधली `दिवाळी` !
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस निरीक्षकाच्याच घरी चोरट्यांनी साधली `दिवाळी` !

खासगी कामानिमित्त कुटुंबासह पुण्याला गेले. दुसऱ्यादिवशी रात्री दहाला घरी परतले. कारमधून उतरल्यानंतर निरीक्षक कोकरे यांच्या पत्नी अर्चना यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

पोलिस निरीक्षकाच्याच घरी चोरट्यांनी साधली `दिवाळी` !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

 धुळे ः शहरासह परिसरात घरफोडीचे प्रकार घडतच आहेत. त्यात चोरट्यांनी आझादनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांचे वन विभाग कार्यालयासमोरील पोलिस क्वार्टरमधील घरात हातसफाई केली. चोरट्यांनी सहा लाखांचे दागदागिने लंपास करत दिवाळी साजरी केली. या घटनेने पोलिस प्रशासनाला आव्हान दिले आहे. 


पोलिस निरीक्षकाकडील चोरी आणि भावसार कॉलनीतील चोरीमागे एकच टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता व्यक्त होते. यात पोलिसांचीच घरे सुरक्षित नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरातील पालेशा महाविद्यालय रोडवर पोलिस क्वार्टर आहेत. त्यात बंगला क्रमांक ११ मध्ये आझादनगर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक कोकरे वास्तव्यास आहेत. रजा मंजूर झाल्याने ते ७ नोव्हेंबरला खासगी कामानिमित्त कुटुंबासह पुण्याला गेले. दुसऱ्यादिवशी रात्री दहाला घरी परतले. कारमधून उतरल्यानंतर निरीक्षक कोकरे यांच्या पत्नी अर्चना यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कडी तुटलेली दिसली. त्यामुळे कोकरे कुटुंबाला चोरट्यांनी घरात हातसफाई केल्याचा संशय आला. 


घरात प्रवेशानंतर लोखंडी कपाटातून दागदागिने लंपास झाल्याचे निरीक्षक कोकरे यांना निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बंगल्याच्या प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या तिजोरीतून दीड लाखाच्या किमतीची सहा तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ, एक लाख २५ हजार किमतीचा पाच तोळे वजनाचा नेकलेस, ५० हजारांच्या किमतीच्या दोन तोळे वजनाच्या बांगड्या, एक लाख १२ हजार ५०० किमतीचे साडेचार तोळे वजनाचे मंगळसूत्र यांसह एकूण २४ तोळे ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४० हजारांच्या चांदीचा झल्ला, पैंजण, श्री गणपती, श्री गणपतीचे चिन्ह असलेले चांदीचे नाणे, अशा एक किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्या. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत पाच लाख ९८ हजार ७५० रुपये आहे. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक पाडवी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे