संकटकाळात डॉ. भामरेंनी सांधला मानवतेचा पूल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

टोकन नंबरच्या आधारे त्या- त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांशी डॉ. भामरे यांनी संपर्क साधला आणि "ई- पास' प्राधान्याने मंजूर करून घेतले.

धुळे ः संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे देश पाच वेळा "लॉक डाउन' झाला. त्यामुळे त्या- त्या कालावधीत हजारो व्यक्ती आहे तिथे अडकल्या. त्यांच्या मदतीला माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे धावले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आणि येथील जनसंपर्क कार्यालयात समस्या निवारण केंद्र सुरू करत अडल्या-नडलेल्यांना मदतीचा हात दिला. यात मानवतेचा पूल सांधत डॉ. भामरे यांनी देशातील अडीच हजार व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. 

"लॉक डाउन'मुळे देशासह विदेशात, राज्यात ठिकठिकाणी अनेक परप्रांतीय, परजिल्ह्यातील आणि आपल्या जिल्ह्यातील नोकरदार, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, कामगार, पर्यटक आदी विविध घटक अडकून पडला. काही जण अडीअडचणींसह कुटुंबासहीत अडकून पडले. त्यांना स्वगृही परतण्याची आस होती. मात्र, मार्ग सापडत नव्हता. 

डॉ. भामरेंकडून "लिंक' 
असे असताना लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. भामरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मीडियावर ठिकठिकाणी अडकून पडलेल्या व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी सहकार्य करणार असल्याची "लिंक' प्रसारित केली. तसेच पारोळा रोडवरील जनसंपर्क कार्यालयात समस्या निवारण केंद्र सुरू केले. याद्वारे संबंधित नागरिकांना "ई- पास'च्या परवानगीसाठी भरावयाचा अर्ज आणि आवश्‍यक ती माहिती मिळाली. त्या नागरिकाने "ऑनलाइन' अर्ज केल्यानंतर मिळणारा टोकन नंबर जनसंपर्क कार्यालयास देण्याचे आवाहन केले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. 

दिलासा मिळाल्याने आभार 
टोकन नंबरच्या आधारे त्या- त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांशी डॉ. भामरे यांनी संपर्क साधला आणि "ई- पास' प्राधान्याने मंजूर करून घेतले. त्यामुळे संबंधित नागरिकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला. यात काही स्थानिक नागरिकांना अर्जाची प्रक्रिया करता येत नव्हती. त्यांना जनसंपर्क कार्यालयात शारीरिक अंतराचे नियम पाळून अर्ज प्रक्रिया करण्यास मदत केली. तसेच काही नागरिकांना वैद्यकीय मदतीची गरज, नात्यातील अंत्यसंस्कारासाठी तत्काळ परवानगी मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत प्रश्‍न सोडविले. संवेदनशील स्थितीत प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून झालेल्या या मदतीमुळे संबंधित नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी दूरध्वनी, ई- मेलव्दारे डॉ. भामरे यांचे आभार मानले. 

या भागातील नागरिकांना मदत... 
मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, नगर, रायगड, रत्नागिरी, नांदेड, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला, नंदुरबार, चंद्रपूर, कोल्हापूर, पालघर, जळगाव, धुळे, हिमाचल प्रदेश, केरळ, तमिळनाडू, गोवा, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थानसह आदी ठिकाणच्या नागरिकांना डॉ. भामरे यांच्या मदतीचा लाभ झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule In times of crisis, Dr. Bhamre built a bridge of humanity