esakal | संकटातील व्यावसायिकांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल! 
sakal

बोलून बातमी शोधा

संकटातील व्यावसायिकांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल! 

संबंधित व्यावसायिकांच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीला सहकारी व काही राष्ट्रीयीकृत बॅंका पाठबळ देण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यांनी विविध प्रोत्साहनात्मक कर्जाऊ योजना आणल्या आहेत. 

संकटातील व्यावसायिकांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल! 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

 
धुळे: कोरोनामुळे शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे या निकषांचा प्रामुख्याने रिक्षाचालक, खासगी प्रवासी वाहतुकीची काही साधने, विद्यार्थी वाहतुकीची वाहने, सलून आदींना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हातावर पोट असणारे व अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. या व्यावसायिकांना चरितार्थासाठी व्यवसाय बदलण्याशिवाय पर्याय उरला नाही.

ब्यूटिपार्लर, खाद्यपदार्थ, चर्मोद्योगांना कास बदलावी लागत आहे. ही संधी हेरून का होईना संबंधित व्यावसायिकांच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीला सहकारी व काही राष्ट्रीयीकृत बॅंका पाठबळ देण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यांनी विविध प्रोत्साहनात्मक कर्जाऊ योजना आणल्या आहेत. जळगाव जनता सहकारी बँकेसह अन्य काही राष्ट्रीयीकृत बँकांनी संबंधित व्यावसायिकांसह विद्यार्थी, महिला वर्गालाही प्राधान्य दिले आहे. 
 

या व्यवसायांकडे कल 
अनेक रिक्षा व्यावसायिकांचा कल भाजी, फळ विक्री, बिस्कीट, खारी, टोस्ट आदी विक्रीकडे आहे. यात सर्वाधिक झळ बसलेल्या विद्यार्थी वाहतूक आणि पर्यटनासह बाहेरगावी जाण्यास बंधने आल्याने खासगी कारचालकांनाही भाजी, फळ, खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायाकडे वळावे लागले आहे. त्यांच्यासाठी जळगाव जनता सहकारी बँकेने एक लाख रुपयांच्या मर्यादेत आणि ११ टक्के दराने कर्ज उपलब्ध केले आहे. बँकेच्या या स्वयंसिद्ध योजनेचा लाभ सलून, टेलर, ब्यूटिपार्लर, चर्मोद्योग, खाद्यपदार्थ क्षेत्रातील लघुव्यावसायिक घेत आहेत. 
 

विद्यार्थ्यांनाही दिलासा 
शाळा, महाविद्यालये बंद आणि अनेक संस्था, कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेवर भर दिल्याने बाजारपेठेत लॅपटॉप, स्मार्ट मोबाईलला मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांसह गरजूंना ही साधने उपलब्ध होण्यासाठी शारदा शैक्षणिक योजनेंतर्गत जळगाव जनता बँकेने साडेसात टक्के दराने आणि या साधनांच्या मूळ किमतीवर सरासरी ९० टक्के कर्ज दिले जात आहे. काही व्यावसायिक बचतीतून सोन्याची गुंतवणूक करतात. त्यांना सोनेतारण कर्जाद्वारे ८.९५ टक्के दराने, तर शुद्ध सोन्याच्या बाजारभावावर सरासरी ७५ टक्के कर्ज दिले जात आहे. 

व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद 
कोरोनामुळे सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील आर्थिक घडी अद्याप नीट बसलेली नाही. त्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी, ग्राहकांची बँकांकडे कर्ज मागणीसाठी गर्दी होत आहे. विविध योजनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बँकाही विमा पॉलिसी काढून सुरक्षित कर्ज देण्यावर भर देत आहेत. जळगाव जनता सहकारी बँकेच्या देवपूर शाखेतून आतापर्यंत ४७ व्यावसायिक, अन्य ग्राहकांनी योजनांचा लाभ घेतला आहे. शहरात ही संख्या वाढत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे