esakal | खानदेशात भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून 
sakal

बोलून बातमी शोधा

खानदेशात भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून 

श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो.

खानदेशात भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून 

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी  : खानदेशात परंपरागत चालत आलेले अनेक सण-उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीत दगडालाच नव्हे, तर शेणालाही पुजले जाते. यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खानदेशातील भालदेव सण. भालदेव उत्सवाची अनोखी परंपरा ग्रामीण भागात आजही टिकून आहे.

ग्रामीण भागात घरोघरी भालदेवाचे पूजन केले जाते. अष्टमीला (२६ ऑगस्‍ट) भालदेवाचे विसर्जन केले जाईल. खानदेशात ग्रामीण भागात पोळ्यापासून ते दिवाळीपर्यंत स्थानिक सण-उत्सवाची रेलचेल असते. या सणाची कुठल्याच दिनदर्शिकेत नोंद नसते. पण हे सण रूढी-परंपरा जोपासताना परस्परांत स्नेह निर्माण करतात. एकसंधपणाची भावना त्यातून निर्माण होते. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो. भारत कृषिप्रधान देश असल्यामुळे दुभत्या पशूंना देव मानण्याची परंपरा आहे. त्या देवतांची पूजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. 

...असा होतो साजरा सण 
खानदेशात भालदेव उत्सव साजरा करण्याची अनोखी पद्धत पूर्वापार सुरू आहे. श्रावण अमावास्येला दुसऱ्या दिवशी भालदेवाची विधिवत स्थापना केली जाते. भालदेवाचे आगमन झाल्यानंतर घरातील कुठलीही वस्तू विकली जात नाही किंवा बाहेरही जाऊ दिली जात नाही. त्यामुळे एक प्रकारे सर्वच व्यवहार ठप्प होतात. या काळात दुभत्या जनावरांचे संपूर्ण दूध घरातच ठेवले जाते. दुधापासून दही, ताक, बनविले जाते. शेजाऱ्यांना व गल्लीतील लोकांना घरी बोलावून ताक प्राशन करण्यास दिले जाते. परंतु हे दुधाचे पदार्थ दुसऱ्याच्या घरी देता येत नाही. 

पूजेची अनोखी पद्धत 
ज्याच्या घरी दुभती जनावरे आहेत त्याचा ओला भालदेव व ज्याच्याकडे दुभती जनावरे नसतील त्याच्याकडे कोरडा भालदेव असतो. भालदेव उत्सव पाच, सात, नऊ दिवसांचा साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी रुईच्या पाच किंवा सात पानांवर गायीच्या शेणाचे गोळे करून ठेवले जातात. त्यावर पांढऱ्या रंगाचे दगड किंवा कवड्या ठेवल्या जातात. पूजेसाठी रुईची पाने व लव्हाळी आणली जाते. भालदेवावर दूध-भात शिंपडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविले जातो. त्याचप्रमाणे केरसुणी व ताक बनविण्यासाठी लागणारी रही (रवी) हिचीही पूजा केली जाते. अष्टमील विधिपूर्वक भालदेवाचे विसर्जन केले जाते. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top