esakal | लोकांच्या सुरक्षेसाठी गमावला स्‍वतःचा जीव
sakal

बोलून बातमी शोधा

truck driver death electric shock

गुजरातमधून मालाचा ट्रक आंध्र प्रदेशात जात होता. यादरम्यान चालक धुळे शहरातील घरी गुरुवारी (ता. ५) रात्री मुक्कामाला थांबला. सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

लोकांच्या सुरक्षेसाठी गमावला स्‍वतःचा जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : वीजतार तुटून झालेल्या अपघातात शहरातील चितोड रोडवरील ट्रकचालकाचा करुण अंत झाला. त्यामुळे परिसरात चीड आणि घटनेनंतर हळहळ व्यक्त झाली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तुटलेली विजेची तार बाजूला हटविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाला शॉक लागल्याने तो जागीच ठार झाला. 
गुजरातमधून मालाचा ट्रक आंध्र प्रदेशात जात होता. यादरम्यान चालक धुळे शहरातील घरी गुरुवारी (ता. ५) रात्री मुक्कामाला थांबला. सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. वीज कंपनीच्या हलगर्जीमुळे ही घटना घडल्याचा आरोप करत परिसरातील नवजीवननगर भागातील रहिवाशांनी चीड व्यक्त केली. शहर पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली. तुटून पडलेली वीजतार दुपारी एकपर्यंत हटविली गेली नव्हती. 

पहाटे उठताच दिसली तार
नवजीवन भागातील ट्रकचालक जब्बार अल्लाउद्दीन पिंजारी तसेच त्यांचा भाऊ शकील अल्लाउद्दीन पिंजारी (वय ४२) गुजरातमधील भावनगर येथून ट्रक (एमएच १८, बीजी ५४९७) आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे नेत होता. धुळेमार्गे जाताना रात्री ट्रकचालक घरी मुक्कामाला थांबला. त्यांनी मिलच्या भिंतीलगत एका मंदिरासमोर ट्रक लावला. माल असल्याने संरक्षणासाठी शकील पिंजारी ट्रकवर झोपला. तो सकाळी उठला. ट्रकजवळ वीजतार तुटून पडली होती. शेजारी राहणाऱ्या जयश्री शेलार यांना हा प्रकार दिसला. त्यांनी ती तार तुटल्याचे शकीलला सांगितले. तोपर्यंत ही घटना शकीलच्या लक्षात आली. 

अन्‌ तार अंगावर आली
कुणाला शॉक लागू नये, म्हणून स्वत:च हातात काठी घेत तुटलेली तार सुरक्षितस्थळी बाजूला लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेटोळे झालेल्या तारेत वीजप्रवाह होता. तारेला पडलेले वेटोळे सुटले आणि ती तार शकीलच्या अंगावर उलटली. वीजप्रवाहामुळे शकील दूर फेकला गेला आणि शरीर काळेनिळे पडले. त्यामुळे घटनास्थळीच शकीलचा अंत झाला. ही घटना घडताच भाऊ जब्बार यांनी शकीलला जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, तत्पूर्वीच शकीलचा मृत्यू झाला होता. शकीलच्या कुटुंबात सहा भावंडे आणि दोन बहिणी आहेत.