esakal | जिवलग मैत्रिणी आल्‍या होत्‍या माहेरी; दोघांनी सोबत घेतला टोकाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

लहानपणापासून सोबत राहिल्‍या, खेळल्‍या आणि शाळेतही सोबतच जायच्या. दोघांचा विवाह होण्यास देखील सात- आठ महिन्यांचा कालावधी झाला होता. लॉकडाउनमुळे बऱ्याच दिवसांनी दोन्ही मैत्रीणी माहेरी आल्‍या होत्‍या. येवून दोन- तीन दिवसच झाले असताना शेतात सुनसान जागी जावून दोघांनीही सोबतच विषायी द्रव्य प्राशन केले.

जिवलग मैत्रिणी आल्‍या होत्‍या माहेरी; दोघांनी सोबत घेतला टोकाचा निर्णय

sakal_logo
By
एल.बी.चौधरी

सोनगीर (धुळे) : कलमाडी (ता. शिंदखेडा) येथील दोन विवाहित मैत्रिणींनी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मागे विहीरीजवळील शेतात जाऊन एकाच वेळी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक मयत झाली असून दुसरी गंभीर आहे. सदर घटना आज (ता. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही चार पाच दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. याप्रकरणी एकच खळबळ उडाली असून आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. सोनल काया भिल (वय २२) असे मयताचे नाव आहे.

कलमाडी गावात सोनल काया भिल व रूपाली किशन भिल (वय २२) या दोन्ही लहानपणापासून सोबत राहिल्‍याने त्‍या जीवलग मैत्रिणी होत्या. सोनलचे वडील संतोष सोनवणे व रुपालीचे वडील बारकू भील हे शेजारीच राहतात व शेतात मजूरी करतात. घरातील गरीबी व अशिक्षितपणामुळे दोन्ही मैत्रिणींना फारसे शिक्षण घेता आले नाही. दोघींचे लग्न आठ- दहा महिन्यांपूर्वीच झाले होते. दरम्यान सोनलचे पती अंचाळे (ता. शिंदखेडा) येथे तर रुपालीचे पती बाभळे (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी आहेत. 

माहेरी आल्‍या पण
दोन्ही मैत्रिणी काही दिवसांपुर्वीच माहेरी आल्या होत्या. दोन- तीन दिवस दोघांनी आनंदात काढले. पण आज दुपारी त्‍या घरून निघाल्‍या आणि कलमाडी गाव ते मुंबई आग्रा महामार्गादरम्यान रस्त्यालगत जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. त्याच्या मागे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीजवळील शेतात दोघींनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. बोर्डे यांनी सोनल भिल हिला मयत घोषित केले. तर तिची मैत्रीण रुपाली भील हिला पुढील उपचारासाठी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. याप्रकरणी सोनलचे वडील संतोष उखा सोनवणे यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात खबर दिली. कलमाडी नरडाणा पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने गुन्हा नरडाणा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याबाबत गावात खळबळ उडाली आहे. सोनलवर सायंकाळी सातच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे