दुर्दवी : दोन शिक्षकांसह तरुणीने उचलले टोकाचे पाऊल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त झाली. यात तरूणीला धमकी दिली जात असल्‍याने तिने टोकाचे पाऊल उचलले. तर दोघांनी कर्जबाजारीपणा व आजाराला कंटाळून आत्‍महत्‍या केली.

धुळे : शहरातील देवपूरमधील दोघा शिक्षकांनी आणि चितोड रोड परिसरातील तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त झाली. यात तरूणीला धमकी दिली जात असल्‍याने तिने टोकाचे पाऊल उचलले. तर दोघांनी कर्जबाजारीपणा व आजाराला कंटाळून आत्‍महत्‍या केली.

गोपाल हरी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले ललित हिंमतराव कुवर (वय ३४) यांना अल्सरचा त्रास होता. त्यामुळे ते त्रस्त होते. त्यांनी घरी कुणीही नसताना ओढणीने गळफास घेतला. नंतर कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. श्रमसाफल्य कॉलनीत रमेश सखाराम पाटील (वय ५४) वास्तव्यास होते. त्यांनी कर्जबाजारीपणातून बुधवारी सकाळी घरी गळफास घेतला. त्यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला. ते देवभाने येथे शिक्षक होते. या दोन्ही घटनांची पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली. 
 
तरुणीची आत्महत्या 
धमकीसह लग्न कर, असा तगादा लावणाऱ्या तरुणामुळे चितोड रोड परिसरातील वीस वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. ईखेनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या पीडित आईने घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तरुणीला विजय शिंदे (वय २५, रा. मंचर, जि. पुणे) हा वारंवार त्रास द्यायचा. लग्नासाठी तगादा लावायचा. तिने दुर्लक्ष केले की तो धमकी द्यायचा. यातून तिने ३१ ऑगस्टला दुपारी बारानंतर घरी साडीने गळफास घेतला. तिच्यावर खासगी रुग्णालयात, नंतर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार झाले. मात्र, बुधवारी रात्री सव्वानऊनंतर तिला डॉ. अरुणकुमार नागे यांनी मृत घोषित केले. छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्या प्रकरणी संशयित विजय शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू 
बेपत्ता महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. रत्नाबाई संदीप आयनोर (वय २८, रा. सडगाव, ता. धुळे) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा एक सप्टेंबरपासूनच बेपत्ता झाल्याने शोध सुरू होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule two teacher and one girl suicide