esakal | दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !

पावणे दोन वर्षांची बालिका तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना गॅलरीच्या पाईपावर चढली. आणि तोल जाऊन खाली विद्युत तारांवर आदळून खाली पडली. पडताच ती बेशुध्द झाली.

दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !

sakal_logo
By
प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे): तीन मजली इमारतीवरून पडणे त्यात खाली विजेच्या तारा असतांना कुणाचेही वाचणे अशक्यच. पण इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडूनही पावणे दोन वर्षांची चिमुरडी दैव बलवत्तर म्हणून वाचली. या घटनेमुळे "देव तारी त्याला कोण मारी" या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली.

येथील भोई गल्लीतील बहिरम चौकात निसार मासुम तांबोळी यांची तीन मजली इमारत आहे.  माहीन अब्रार तांबोळी ही पावणे दोन वर्षांची बालिका सकाळी अकराच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना गॅलरीच्या पाईपावर चढली आणि तोल जाऊन खाली कोसळली. इमारतीलगत विजेच्या तारा असून त्यावेळी सुदैवाने वीज बंद होती. तारांवर आदळून ती खाली रस्त्यावर पडली. समोरच नानाभाऊ मोहने यांचे किराणा दुकान असून चिमुरडी पडल्याचे पाहून त्यांनी त्वरित तेथे धाव घेतली. गल्लीतील लोकांनीही धाव घेत घटनास्थळी गर्दी केली होती.

तिसऱ्या मजल्यावरून अर्थात 28 फुटांवरून पडलेली चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडली असावी असेच सर्वांना वाटत होते. पण तसे काहीच घडले नाही. ती फक्त बेशुद्ध पडली होती. मग ती चिमुकली पडली कशी असावी? यावर तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. तिच्या कुटुंबियांचे तर तोंडचे पाणीच पळाले होते. त्यांनी ताबडतोब तिला उचलून गावातील स्थानिक डॉक्टरांकडे नेले. स्थानिक डॉक्टरांनी चिमुकलीस साक्रीला घेऊन जाण्यास सांगितले. साक्रीच्या डॉक्टरांनीही त्यांना धुळे येथे जाण्याचा सल्ला दिला. चिमुकलीची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने घरचे सर्व जण खूप चिंतेत पडले होते.

दरम्यान चिमुकलीला धुळे येथील सेवा हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. ती चिमुकली पूर्ण एक दिवस बेशुद्ध होती. उपचारानंतर तिला शुध्द आली. पण ती बोलतच नसल्याने डॉक्टरांनी तिच्या डोक्याचे स्कॅन केले. तेव्हा तिच्या कानामागे तडा गेल्याचे तज्ञ डॉक्टरांनी निदान केले. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. तब्बल 18 दिवसांनंतर आता ती चिमुकली बोलू लागली असल्याचे तिच्या आजोबांनी सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे