धुळ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढती, मात्र फक्त ११० रुग्णांना मिळाला लाभ  

निखील सुर्यवंशी
Friday, 18 September 2020

फुले जनआरोग्य योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांना पीपीइ कीट देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने वेळीच घेतला आहे.

धुळे ः राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत संसर्गजन्य कोरोनाबाधित (कोविड) पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्डधारकांना उपचारासाठी मोफत लाभ देऊ केला आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ११० रुग्णांना लाभ मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता तुलनेत ही आकडेवारी बुचकळ्यात टाकणारी आहे. 

गरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरली आहे. यात पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्डधारक एका कुटुंबाला उपचारासाठी सरासरी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च दिला जातो. छायांकीत प्रतीतील रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा पॅनकार्ड अथवा मतदारकार्ड यापैकी एक आणि ते नसल्यास राष्ट्रीयीकृत बँकेचे छायाचित्र व त्यावर अर्धा शिक्का असलेले पासबुक, अधिवास दाखला (डोमेसाईल), तहसीलदारांचे विहित नमुन्यातील पत्र याआधारे योजनेचा कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांना लाभ दिला जात आहे. ‘कोरोना’सह कॅन्सर, ह्रदयविकार, किडनी विकाराचे रुग्ण यासह ९९६ आजारांवर योजनेंतर्गत मोफत उपचार होतात. 

एका कुटुंबाला लाभ कसा? 
रेशनकार्डनुसार एखाद्या कुटुंबात चार ते पाच सदस्य आहेत. पैकी दीड लाखाच्या खर्च मर्यादेत एका सदस्याने २५ ते ३० हजार रुपयांच्या वैद्यकीय खर्चाचा योजनेतून मोफत लाभ घेतल्याचे गृहीत मानले, तर उर्वरित १ लाख २५ हजार ते १ लाख २० हजारांच्या शिल्लक खर्चाचा संबंधित सदस्य किंवा कुटुंबातील अन्य सदस्य उपचारासाठी लाभ घेऊ शकतो. सरकारने २३ मेपासून तीन रंगांच्या रेशनकार्डधारकांना कोविडबाबत मोफत उपचाराची सुविधाही दिली आहे. 

या रुग्णालयांत मिळतो लाभ 
धुळे जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून घोषित हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय, शिरपूर व दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय, साक्री ग्रामीण रुग्णालय, धुळे शहरात सुधा, विघ्नहर्ता, सेवा आणि जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. यात बाधित ११० पैकी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयात सरासरी ५० ते ५५, तर उर्वरित काही खासगी रुग्णालयात योजनेचा लाभ दिला गेला आहे. 
 

योजनेतून पीपीई कीटचा लाभ 
फुले जनआरोग्य योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांना पीपीइ कीट देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने वेळीच घेतला आहे. यात अशा रुग्णालयांनी वाढीव खर्च कसा सादर करावा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वेही परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहेत. तसेच नागरिकांनी अधिक माहितीसाठी १५५३८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Very few patients in Corona benefit from the Mahatma Phule scheme