भिंती- भिंतीवर उमटले पाढे अन्‌ कविता; शिक्षक पती- पत्‍नीचा उपक्रम महत्‍त्‍वाचा

दगाजी देवरे
Friday, 16 October 2020

मोफत पाठ्यपुस्तक योजना १५ जूनला पोहचविली. उत्साही विद्यार्थ्यांना आनंद झाला. काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे ग्रुप तयार करून अभ्यास, व्हिडीओ तयार करून टाकणे, दीक्षा अँपचा वापर संदर्भात ग्रुपवर आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रवाहात जोडून ठेवले.

म्हसदी (धुळे) : कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक जण भयभीत आहे. त्यात विद्यार्थीही अपवाद नाहीत. शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. परंतु शिक्षकांनी ठरविले आणि विद्यार्थ्यांनी धैर्य दाखवले तर शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवल्याचे धाडस अनेक ठिकाणी सुरु आहे. भिलाईपाडा (ता.नंदुरबार) येथील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक दाम्पत्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रबोधन करत हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. 
कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षणासाठी पाठबळ दिले. अनेक अडचणीमुळे उपक्रम सावकाश सुरू आहे. असे असताना भिलाईपाडा शाळेचे शिक्षक संतोष नांद्रे व शिक्षिका वृषाली नांद्रे यांनी विद्यार्थ्यी पालकांच्या मोबाईलद्वारे आरोग्याच्या सूचना देणे, अभ्यासाचा चौकशी केली. सतत संपर्क वाढत राहिला. गटशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील यांनी नंदुरबार तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक योजना १५ जूनला पोहचविली. उत्साही विद्यार्थ्यांना आनंद झाला. काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे ग्रुप तयार करून अभ्यास, व्हिडीओ तयार करून टाकणे, दीक्षा अँपचा वापर संदर्भात ग्रुपवर आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रवाहात जोडून ठेवले. मोबाईलची कमतरता, नेटवर्क नसणे, रिचार्ज नसणे यामुळे अडचणी निर्माण झाल्या. शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामस्थ, शिक्षक पालक संघाच्या सहमतीने विद्यार्थ्यांना गटागटाने अभ्यासाला बसवण्याचे नियोजन केले. 

विद्यार्‍थ्‍यांनाच केले गट प्रमुख
एक ते चार वर्गाची पटसंख्या ७८ असून विद्यार्थ्यांचे ९ गट तयार करण्यात आले. हुशार विद्यार्थ्यांना गटाचे प्रमुख बनवून मार्गदर्शनासाठी मदत घेतली. हजेरीची पाने देऊन हजेरी भरण्याचा अनुभव दिल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला. गावातील युवकांनी पाठबळ दिले. दररोजचे ऑफलाईन शिक्षण सुरू झाले. प्रत्येक गटाने भिंतींवर फलक रंगविले. शब्द, वाक्य, कविता, चित्र यांचे रेखाटन विद्यार्थी स्वतः करतात. इतरांना मार्गदर्शन करतात. प्रार्थनेची पुस्तके पुरवत प्रार्थना, कविता, पाढे, उत्साहाने म्हणतात. दूरदर्शनवरील टीली- मिली कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही असलेल्या प्रत्येक घरी चॅनलचा नंबर व वेळापत्रक लिहून देण्यात आले. ऑफलाईन शिक्षणचा पर्याय सोईस्कर व उत्तम वाटला. 

विद्यार्‍थ्‍यांना मिळवून दिले साहित्‍य
विद्यार्थ्यी स्वयं अध्ययनात रस घेऊ लागले. कविता, पाढे बोलत, चित्र काढत योगा करू लागले. गणेश उत्सव व बैल पोळा सणाच्या निमित्ताने अनेक मुलांनी हस्तकलेत मातीचे गणपती, बैल तयार केले. नंदुरबार येथील डी. एस. सी संस्थेची मदत घेत विद्यार्थ्यांना मास्क, अंकलिपी, रजिस्टर, पेन कंपास साहित्य मिळवून दिले. नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेकडून मास्क, सॅनिटायझर, व्हिटॅमिन सी, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनाबाबत जनजागृती करत भीती दूर केली. स्टेट बँकेकडूनही वह्या, पेनची मदत मिळाली. स्वाध्याय पुस्तिका देऊन शिक्षक मार्गदर्शन करत आहेत.गटशिक्षणधिकारी डॉ. राहुल चौधरी, शिक्षण विविस्तार अधिकारी एस. एन. पाटील, केंद्र प्रमुख डी. जे. राजपूत यांनी उपक्रमास पाठबळ दिले.

विद्यार्थ्यी पालक व ग्रामस्थांच्या पाठबळावर हा उपक्रम राबविला जात आहे.विशेष म्हणजे विद्यार्थ्यीही सहभागी झाल्याने आनंदायी शिक्षण देता येते.प्रत्येक ठिकाणी उपक्रम राबविला तर विद्यार्थ्यी हीत जपले जाईल.
- संतोष यशवंत नांद्रे, मुख्याध्यापक, खाजगी प्राथमिक शाळा

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule village home to home wall poem and far away teacher