"कोरोना'चा विळखा ः संवेदनशील धुळे जिल्ह्यात चाललंय काय?   

निखिल सूर्यवंशी
Wednesday, 27 May 2020

"कोरोना'चा "हॉट स्पॉट' आणि या ज्वालामुखीच्या तोंडावर धुळे शहर व जिल्हा असताना रोज काही ना काही समोर येणारे गंभीर प्रकार, हे संवेदनशील धुळ्यात नेमकं चाललंय तरी काय, अशी विचारणा करणारे ठरत आहेत.

धुळे ः सरकारी रुग्णालयातून "कोरोना'बाधित किंवा संशयित पळाला... काही सरकारी डॉक्‍टर कामावर येत नाहीत, रजेवर जातात किंवा आले तर थोड्याच वेळात पसार होतात, "ड्युटी' का लावल्याची विचारणा करतात... मग दोन महिन्यांपासून "कोरोना'शी मुकाबला करणाऱ्या सरकारी डॉक्‍टरांनी भार पेलावा का... धुळे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जत्रेचे स्वरूप येत असल्याने संचारबंदी आहे की नाही किंवा काळजी घेतली जाते किंवा नाही, असा प्रश्‍न पडावा... यात पोलिसांचा, कायद्याचा धाक का दिसत नाही..."कोरोना'बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सुयोग्य धोरण निश्‍चित करू शकली नाही... असे अनेक गंभीर प्रश्‍न, प्रकार पाहिल्यानंतर संवेदनशील धुळ्यात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न सुज्ञ नागरिकांना पडतो. 

अवघे जग संसर्गजन्य कोरोना विषाणूशी जीवतोड मुकाबला करत आहे. जिल्ह्यातील विविध यंत्रणेतील अधिकारी, सरकारी डॉक्‍टर, कर्मचारी अहोरात्र "कोरोना योद्धा' म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला प्रत्येकाचा सलाम आहे. असे असले तरी काही गंभीर उणिवांमुळे त्यांच्या कार्यावर कुठे तरी एक काळसर डाग गडद होताना दिसतो आहे. यात त्या- त्या सरकारी विभागात, महाविद्यालयासह रुग्णालयात आणि एकूणच जिल्हा सरकारी यंत्रणा म्हणून जे "टीम वर्क' दिसले पाहिजे, त्यात काहीशी उणीव दिसू लागली आहे. शेजारचे जळगाव, मालेगाव, नाशिक "कोरोना'चा "हॉट स्पॉट' आणि या ज्वालामुखीच्या तोंडावर धुळे शहर व जिल्हा असताना रोज काही ना काही समोर येणारे गंभीर प्रकार, हे संवेदनशील धुळ्यात नेमकं चाललंय तरी काय, अशी विचारणा करणारे ठरत आहेत. 

संतापजनक प्रकाराचा कळस 
विविध प्रकारचा अधिक भार असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून आतापर्यंत चार ते पाच "कोरोना'बाधित, संशयित रुग्ण पळाल्याने गंभीर चिंता व्यक्त होते. त्यामुळे राज्यात या स्थितीबाबत नाचक्की होताना दिसते. त्याचा प्रशासनासह महाविद्यालय व जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का लागत आहे. अशात आज तर एका गंभीर घटनेने धुळेकरांच्या संतापाचा कळसच गाठला. "कोरोना'बाधित पतीचा सोमवारी (ता. 25) मृत्यू झाल्यानंतर त्याची संपर्कातील एकाकी पडलेली 43 वर्षीय पत्नी थेट हिरे महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयातून सकाळी नऊला घराकडे म्हणजे भाटपुऱ्याला (ता. शिरपूर) पायी निघाली. तिच्या घशाचे स्त्रावही तपासणीसाठी घेतले नव्हते. ही संशयित महिला अक्षरशः चटका देणाऱ्या 44 डिग्री सेल्सिअस तापमानात मंगळवारी 70 किमी अंतर कापत उपाशीपोटी पायी निघाली. ती सायंकाळी सहाला शिरपूर सहकारी सूतगिरणीजवळ पोहोचली. हा वेदनादायी प्रकार सरकारी यंत्रणेची अब्रू वेशीवर टांगणारा ठरल्याचे मानले जाते. 

जिल्ह्यात का घडतंय असं? 
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय यादव यांच्याकडील संयुक्त बैठकीवेळी त्यांच्यासह पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी हिरे महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून रुग्ण पळतोच कसा, असा गंभीर प्रश्‍न उपस्थित करत खुलासा मागणारे पत्रही दिले. त्याला महाविद्यालयासह रुग्णालयाने केराची टोपली दाखविली. त्यावर समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. यादव यांना अधिकार असूनही त्यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही. शिवाय शहरात पोलिस व कायद्याचा धाक का नाही, महापालिकेकडून जबाबदारीत होणारी चालढकल व बऱ्याच कार्यवाहीतील विलंब, हिरे महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉक्‍टर, कर्मचारी कामच करताहेत आणि टाळाटाळ करणाऱ्यांना अभय का दिले जाते, तेथील सर्वच "स्टाफ' कौतुकास्पद सेवा देत असताना कारभारात उणिवा राहतात कशा?, "टीम वर्क'चा अभाव दिसण्याची कारणे काय? यातून घडणाऱ्या विविध प्रकारांमुळे जिल्ह्यात का असे घडतेय, असा प्रश्‍न असंख्य धुळेकरांना सतावतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Dhule What is going on in sensitive Dhule district