सोशल मिडीयाची कमाल; मुलगा पोहचला कुटूंबापर्यंत

एल. बी. चौधरी
Tuesday, 13 October 2020

एक मनोरुग्ण महिला आणि आपल्या कुटुंब व गावाबाबत फारशी माहिती नसलेल्या एका लहान मुलाला पोलिसांनी सोशल मिडीयाचा वापर करून नातेवाईकांपर्यंत पोहचविले.

सोनगीर (धुळे) :  कुटूंबापासून दूर झालेली एक महिला आणि एका मुलाला पोलिसांनी त्‍यांच्या कुटूंबापर्यंत पोहचविले. पोलिसांचे प्रयत्‍न आणि त्‍यासाठी सोशल मिडीयाची घेतलेल्‍या मदतीमुळे हे शक्‍य झाले. 

एक मनोरुग्ण महिला आणि आपल्या कुटुंब व गावाबाबत फारशी माहिती नसलेल्या एका लहान मुलाला पोलिसांनी सोशल मिडीयाचा वापर करून नातेवाईकांपर्यंत पोहचविले. नातलग पहाताच भांबावलेल्या मुलाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मुलगा सापडला म्हणून पोलिसांचे त्यांनी हात जोडून आभार मानले. 

नक्‍की पहा - फडणवीस- खडसेंची भेट नाहीच..जामनेरला जाणे टाळले
 

बस नेली पोलिस स्‍टेशनला
एक मनोरुग्ण बुरखाधारी महिला मालेगाव येथून पंढरपूर ते नंदुरबार बसने धुळे जायला निघाली. पण धुळ्याला न उतरल्याने वाहकाने तिची विचारपूस केली. तिने मला गोरखपूर जायचे आहे; असे सांगितल्यावर वाहकाने तिला सोनगीर पोलीस स्टेशनला आणून सोडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी येथील मुस्‍लिम समाजाचे मौलाना जिहाउद्दिन शेख, मोहसीन मणियार, मुन्ना शेख यांच्यामार्फत धुळ्यातील जमात उलेमा यांचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती शरीफ यांच्या मदतीने सोशल मिडियाचा वापर करून शोध घेतला असता तिचे नाव मेहरून्निसा इरफान खान असून ती मोहमद इरफानखान (उत्तरप्रदेश) यांची पत्नी असल्याचे व तिला तीन मुली व एक मुलगा असून ती नवऱ्यासोबत मुंबईला राहते अशी माहिती मिळाली. सदर संस्थेच्या मार्फत तिला तिची मावशी चांदबी रमजान अली खान यांच्या ताब्यात देण्यात आले. 

महामार्गावर फिरत होता मुलगा
दुसऱ्या घटनेत संजय देवरे या पोलिसास देवभाने ते धमाणे फाटा दरम्यान एक आठ वर्षाचा मुलगा मुंबई- आग्रा महामार्गावर एकटा फिरताना दिसला. तो त्याचे नाव डेबा सांगत होता. नातेवाईकांबाबत त्याला काहीच सांगता आले नाही. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केला. हस्ते परहस्ते तो गंगाराम केदार यांना समजल्यावर त्यांनी मुलाचे काका जगदीश भाऊसिंग कनोजे (राहणार धानोली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांना कळवले. मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule women and boy missing but police use social media