
दिव्यांग व्यक्ती म्हटले, की डोळ्यासमोर त्याच्या वेदना, दुःख उभे राहते. अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, येथील पुंडलिक भामरे यांनी दिव्यांगत्वावर मात करत आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
तऱ्हाडी (धुळे) : तरुण वर्ग नोकरी वा व्यवसायात अपयश आले, की नशिबाला दोष देतो. मात्र, येथील पुंडलिक चतुर भामरे दिव्यांगत्वावर मात करून जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. त्यांचा संघर्ष तरुणांना प्रेरणादायी आहे.
दिव्यांग व्यक्ती म्हटले, की डोळ्यासमोर त्याच्या वेदना, दुःख उभे राहते. अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, येथील पुंडलिक भामरे यांनी दिव्यांगत्वावर मात करत आगळावेगळा आदर्श निर्माण केला. त्याचे वडील पीक संरक्षण सोयसायटीचे माजी अध्यक्ष होते. १९६९ मध्ये पुंडलिक भामरे यांचा जन्म झाला. तीन वर्षांचे असताना, पोलिओमुळे त्यांच्या एका हात व पायाला अपंगत्व आले. लहानपणी उपचार केले. मात्र, प्रयत्न व्यर्थ गेले. कायमचे अपंगत्व आले. हातावरच्या रेषा भविष्य ठरवितात, असे मानणाऱ्या आळशी माणसांना त्यांनी जगण्यातून चपखल उत्तर दिले.
पदवीधर होवून सूतगिरणीत काम
एक हात, एक पाय अपंग असतानाही त्यांनी आयुष्य घडविले. त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले आहे. २० वर्षांपूर्वी शिरपूर सहकारी सूतगिरणीत काम केले. गेल्या दोन वर्षांपासून येथे त्यांनी स्वतःचे चेतन पान सेंटर सुरू केले आहे. स्वतः शेतात काम करतात. विविध संकटांचे आव्हान स्वीकारत नवी उमेद निर्माण केली. घरात वृद्ध आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असून, एका मुलीचे लग्न केले आहे. तीन भाऊ येथे शेती करतात. स्वाभिमानाने कमावलेल्या मिळकतीतून पुंडलिक कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आहेत. घरातील कामेही ते चपळाईने करतात. अपंग निराधार योजनेंतर्गत त्यांना प्रतिमाह हजार रुपये मिळतात. कुक्कटपालनसाठी त्यांनी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र, दखल न घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उरलेला वेळ ते सामाजिक कार्यात देतात. त्यांचा हा प्रवास आजच्या तरुणाईला प्रेरणादायी आहे.
संपादन ः राजेश सोनवणे