धुळ्यात प्रथमच पिवळ्या पायाच्या लावा पक्षीची नोंद !

तुषार देवरे
Saturday, 15 August 2020

पक्ष्याच्या माद्या ह्या बहुपतित्व पद्धतीचा अवलंब करता म्हणजेच एका विणीच्या हंगामात अनेक नरांशी समागम करून घरटी बनवून अंडी देतात.

देऊर (ता.धुळे) : नकाणे तलाव सध्या मुबलक पावसाने तुडुंब भरून वाहत आहे. तलाव परिसरात हिरवळ दाटली आहे. त्या अनुषंगाने पावसाळी स्थलांतरीत पक्षी, विनिच्युअ हंगाम सुरु असणारे स्थानिक पक्षी यांना पाहण्यासाठी लगबग पक्षिनिरीक्षकात सुरू आहे. धुळेचे पक्षीनिरिक्षक तेजस पोतदार आज सायंकाळी नकाणे तलाव परिसरात गेले असता त्यांना एक वेगळा पक्षी आढळला. त्यांनी त्याचे छायाचित्र घेतले असता, हा पिवळ्या पायाचा लावा असल्याचा निर्वाळा पक्षीमित्र हिमांशू टेंभेकर यांनी दिला. हिमांशू ह्या दुर्मिळ पक्षाला पाहण्यासाठी गेले. त्यांनी त्याच्या विशिष्ट घुमणाऱ्या आवाजावरून त्याला ओळखले. गवताळ आणि खुरट्या वनात आढळणारा हा पक्षी धुळ्यात आधी आढळला असला तरी त्याची स्पष्ट छायाचित्रण नोंद मात्र झालेली नव्हती. ती आता झाली आहे. लाजाळू पक्षी आहे. तो सहसा दिसत नाही. असे पक्षी निरिक्षक तेजस पोतदार यांनी बोलतांना सांगितले.

हा पक्षी कोंबडीच्या पिल्ला एवढा आहे. इंग्रजीत त्याला "Yellow Legged Button Quail " असे म्हणतात. मादी नरापेक्षा जास्त सुंदर व आकाराने मोठी असते. तिला गळ्यामागे नारंगी पिंगट रंगाचा रुंद पट्टा. पाय व चोच पिवळी जर्द व हीच तिची ओळख ठरते. उडतांना तिची नारंगी तांबूस गळपट्टा, छाती व खालून पांढरा रंग ठळक दिसतो. नराला गळपट्टा नसतो व रंगाने फिकट असतो. पावसाळा हा त्यांचा विणीचा काळ ह्या काळात मादी नराला अन्न पुरवते अंडी घातली गेल्यावर मादि नरावर अंडे उबवण्याची जबाबदारी देऊन निघून जाते. त्यांच्या आहारात हिरव्या वनस्पती सामग्री, बियाणे, आणि बीटल, मुंग्या आणि तळागाळातील विविध कीटकांचा समावेश आहे.

हिमांशू टेंभेकर म्हणाले की , या पक्ष्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यात इतर लावा पक्ष्यांप्रमाणे याला पायाला चौथा बोट नसतो. माळढोकच्या पायाशी साधर्म्य असल्याने त्यांना "bustard Quail" ह्या गटातही गणले जाते.या पक्ष्याच्या माद्या ह्या बहुपतित्व पद्धतीचा अवलंब करता म्हणजेच एका विणीच्या हंगामात अनेक नरांशी समागम करून घरटी बनवून अंडी देतात. पावसाळ्यात मानवी वस्ती जवळ सुरक्षेसाठी त्या वावरत असतात व कधी कधी ग्रामीण भागात घरात देखील शिरतात. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात ह्या पक्ष्याच्या हातावर मोजण्याइतक्या नोंदी आहे रहिवासी असून इतक्या कमी नोंदी असण्याचे कारण म्हणजे हा पक्षी खूप लाजाळू असतो तसेच तो केवळ पावसाळ्यातच आवाज करतो त्यामुळे त्याला शोधणे आणि त्याचा एकूण अभ्यास करणे कठीण आहे.

 

संपादन-भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule yellow-footed lava birds recorded for the first time in dhule