esakal | धुळ्यात गँगवॉर...टोळीच्या वर्चस्वावरून तरूणाचा खून ! 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात गँगवॉर...टोळीच्या वर्चस्वावरून तरूणाचा खून ! 

एका वेअर हाऊसजवळील नाल्यालगत राहुल खाली पडला. ही संधी साधत मारेकऱ्यांनी राहुलवर तलवार, चाकूने सपासप वार केले. त्यात तो मृत्यूमुखी पडला.

धुळ्यात गँगवॉर...टोळीच्या वर्चस्वावरून तरूणाचा खून ! 

sakal_logo
By
निखील सूर्यवंशी

धुळे ः धुळे शहरात गँगवॉरने पून्हा ऐकदा डोके वर काढले असून शनिवारी टोळी व अवैध्य व्यवसायाच्या वर्चस्वावरून तरुण हॉटेल व्यवसायिकाचा खून झाला. या घटनेत शहरालगत लळींग टोलनाका परिसरातील दोन मुंबई- आग्रा महामार्गावरील भरदुपारी साडेतीवाजेच्या सुमारास संशयित १७ ते १८ मारेकऱ्यांनी पिस्तूल, तलवार, चाकूचा सर्रास वापर केला. हॉटेल व्यावसायिकावर सशस्त्र हल्ला झाल्याने तो जागीच ठार झाला. या गंभीर व थरारक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. 


पोलिसांनी एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचे सांगितले. त्यात राहुल मैंद (वय ३८, रा. मोहाडी उपनगर) याचा खून झाला आहे. त्याचे लळींग टोलनाका परिसरात महामार्गालगत पत्राच्या शेडमध्ये हॉटेल महाकाल आहे. तेथे दुपारी साडेतीनच्या सुमारास राहुल, त्याचे मामा, भाचा व मित्र मिळून पाच ते सहा जण बसले होते. काही वेळाने दुसऱ्या टोळीतील १७ ते १८ तरूण मोटारसायकलने हॉटेल महाकालच्या दिशेने चाल करून आले. त्यातील एकाने पिस्तुलीने हवेत तीन ते चार राऊंड फायर केले. या प्रकारामुळे परिसरात इतर व्यावसायिक, ग्राहकांची पळापळ सुरू झाले. 

आपल्या दिशेने संशयितांची टोळी चाल करून येत असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर राहुल व त्याच्या सहकाऱ्यांनी खुर्च्या, इतर साहित्य फेकण्यास सुरवात करून प्रतिकार केला. तसेच राहुल व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळू लागले. त्यांनी सर्व्हिस रोड पार केला. तेव्हा एका वेअर हाऊसजवळील नाल्यालगत राहुल खाली पडला. ही संधी साधत मारेकऱ्यांनी राहुलवर तलवार, चाकूने सपासप वार केले. त्यात तो मृत्यूमुखी पडला. नंतर मारेकरी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, एलसीबीचे पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत, मोहाडी, शहर पोलिस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाहणी करत पुरावे संकलनाचा प्रयत्न सुरू केला. परिसरातून सीसीटीव्हीचे फुटेज मिळविले. तपासात मारेकरी मोहाडी उपनगर व शहरातील देवपूरसह इतर काही भागातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यात शिरूड (ता. धुळे) येथील एटीएमवरील दरोड्यातील आरोपी चॅम्पियन मिलनसिंग भागा (रा. मोहाडी उपनगर) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून इतर माहिती संकलनाचे काम सुरू होते. दोन्ही गटातील अनेक मारेकऱ्यांवर पूर्वी विविध पोलिस ठाण्यात निरनिराळ्या कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

संशयितांची पळापळ; पावसाचा अडसर 
पोलिसांनी तपासाला गती दिल्यांनतर १७ मारेकरी मोटारसायकलने नेर, चिमठाणा, शिरपूरसह जिल्ह्यातील विविध भागात पळत होते. शिरपूर तालुक्यातील एका गावातून त्यांना हुसकावण्यातही आले. पोलिसांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी तीन पथके नेमली आहे. सायंकाळी पावसाने वेग धरल्यामुळे तपासात काहीसा अडसर निर्माण होत होता. राहुलच्या शवविच्छेदनानंतर त्याला पिस्तूलची गोळी लागली किंवा नाही ते समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. 

 संपादन- भूषण श्रीखंडे