मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचे धुळ्यात झाले शवविच्छेदन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

युसूफ मेमन याचे शुक्रवारी सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अचानक हृदयविकाराने झटक्‍याने मृत्यू झाल्याने धुळ्यातील जुने सिव्हिल येथील शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आले होते.

धुळे  : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचे नाशिक कारागृहात हृदयविकाराने तीव्र झटक्‍याने निधन झाले. मृत मेमनवर येथील जुने सिव्हिल रुग्णालयात शनिवारी दुपारी अडीचला शवागारात पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन झाले. यानंतर रुग्णवाहिकेने मृतदेह मुंबईला नेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी तर 1 हजार 400 हून अधिक गंभीर जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्याचे कट दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी रचला होता. यामध्ये युसूफ मेमन आणि त्याचा भाऊ इसाक मेमन यांचा समावेश होता. मुंबई उच्च न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबईच्या ऑर्थर रोड तसेच औरंगाबादच्या कारागृहा शिक्षा भोगत होते. यात 2018 मध्ये युसूफ मेमनची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना युसूफ मेमन (वय57) याचे शुक्रवारी सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अचानक हृदयविकाराने झटक्‍याने मृत्यू झाल्याने धुळ्यातील जुने सिव्हिल येथील शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आले होते. धुळे, नंदुरबारसह जळगाव आणि नाशिक चार जिल्ह्यांचे मेडिकल बोर्ड धुळ्यात असल्याने त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळ्यात आणले. शनिवारी (ता.27) दुपारी अडीचला पोलिस बंदोबस्तात मृत मेमनचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मुंबईला पाठविण्यात आला. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार सी.एस.पाटील, भूषण खेडवंत,व्ही.एस. शिंपी, विलास पाटील, दिनेश महाले यासह नाशिक कारागृहाचे दोन अधिकारी पाच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Yusuf Memon, accused in Mumbai serial bomb blasts, was autopsied in Dhule