esakal | धुळे जि. प. च्या त्‍या कामांना `ब्रेक` 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule zilha parishaddhule zilha parishad

जिल्हा परिषदेत मार्च ते ऑगस्टपर्यंत झालेल्या स्थायी, सर्वसाधारण व इतर सभांमध्ये सत्ताधारी भाजपच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी बहुमताच्या जोरावर आयत्या वेळच्या विषयात मंजूर केलेली कामे सीईओंनी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

धुळे जि. प. च्या त्‍या कामांना `ब्रेक` 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये सध्या वाद सुरू आहेत. ते टोकाला गेले आहेत. यात विविध सभांमध्ये आयत्या वेळच्या विषयात आर्थिक धोरणात्मक विषय अजेंड्यावर घेऊन विनाचर्चा मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न महाविकास आघाडीने हाणून पाडला आहे. यात सरकारपर्यंत तक्रारी झाल्यानंतर सीईओ वान्मती सी. यांनी अशा वादग्रस्त कामांना `ब्रेक` लावला आहे. महाविकास आघाडीचे गट नेते पोपटराव सोनवणे यांनी ही माहिती दिली. 

जिल्हा परिषदेत मार्च ते ऑगस्टपर्यंत झालेल्या स्थायी, सर्वसाधारण व इतर सभांमध्ये सत्ताधारी भाजपच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी बहुमताच्या जोरावर आयत्या वेळच्या विषयात मंजूर केलेली कामे सीईओंनी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत हा प्रकार केल्याचा श्री. सोनवणे यांचा आक्षेप आहे. त्यामुळे सीईओंनी मुख्य लेखा व वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, आरोग्य विभागानिगडीत विविध कामांची अंमलबजावणी तत्काळ थांबवावी, असा आदेश विभागप्रमुखांना दिला आहे. 
श्री. सोनवणे यांनी वादग्रस्त सभांमध्ये आयत्या वेळच्या विषयात लाखोंची आर्थिक धोरणात्मक निर्णयाची कामे ठरावाव्दारे मंजूर झाली, ते योग्य नाही, चर्चेला न आलेले विषय इतिवृत्तात समाविष्ट केले व त्यांना पुढील सभेत मंजुरी घेतली, विनाचर्चा विषय मंजूर करणे, सदस्यांना बोलू न देणे, हरकत नोंदविली असता विरोधकांना सूचक म्हणून दर्शविणे, विविध प्रकारची माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करणे, कारभारात अनियमितता, गैरप्रकार होत आहे, अशा गंभीर तक्रारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्या. त्यांनी उपसचिवांमार्फत नाशिक विभागीय आयुक्तांव्दारे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह १३ सदस्यांना कारणेदाखवा नोटीस काढावी आणि त्यांना अपात्र ठरवावे, अशी सूचना यंत्रणेला दिली. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी श्री. सोनवणे यांचे आरोप, तक्रारी तथ्यहीन असून ते जिल्हा परिषदेसह १३ सदस्यांची बदनामी करत असल्याचा प्रत्यारोप केला होता. या वादात सीईओंनी सावध पवित्रा घेत श्री. सोनवणे यांनी हरकत घेतलेल्या कामांना `ब्रेक` लावला आहे. 

loading image