ऑफलाइन शिक्षक बदल्यांच्या पूर्वतयारीला वेग 

तुषार देवरे
Monday, 27 July 2020

शिक्षक सेवा ज्येष्ठता यादी पडताळणीसाठी शिक्षक व्यस्त आहेत. तांत्रिक चुका दुरुस्त करत आहेत. सर्व एकत्रित पंधरा टक्के बदल्या होतील.

देऊर : धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, पदोन्नती मुख्याध्यापक यांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन न करता ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. शनिवारी (ता.२५) नुकतीच धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुकास्तरावरून मराठी, ऊर्दू माध्यमनिहाय टीयूसी जिल्ह्याची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी शिक्षकांची स्वतंत्र बदलीपात्र यादी जिल्हास्तरास प्राप्त झाली आहे. या याद्या मराठी व ऊर्दू माध्यमनिहाय स्वतंत्र बदलीपात्र संबंधित तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तालुका गटस्तरावरील दर्शनीय फलकावर व्हॉट्‍सॲप तथा ई- मेल इतर सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. 
शिक्षक सेवा ज्येष्ठता यादी पडताळणीसाठी शिक्षक व्यस्त आहेत. तांत्रिक चुका दुरुस्त करत आहेत. सर्व एकत्रित पंधरा टक्के बदल्या होतील. 
‘कोविड- १९’ च्या प्रादुर्भावामुळे यंदा जिल्हातंर्गत बदल्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित कालावधी ऑनलाइन बदल्या करणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व पदोन्नती मुख्याध्यापक यांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने न करता ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. मात्र, ऐनवेळी शासन स्तरावरून पत्र आल्यास बदली प्रक्रियेला स्थगिती मिळू शकते. काही दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करण्याची सूचना चारही तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना केली होती. बदल्यांसंदर्भात सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करताना ‘कोविड- १९’च्या प्रादुर्भावासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी दिल्या आहेत. 

अशी होईल प्रक्रिया 
प्रसिद्ध यादीवर हरकती आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक गटस्तरावर करण्यात आली आहे. संबंधित गटातील शिक्षकांनी मंगळवार (ता.२८)पर्यंत बदलीपात्र सेवाज्येष्ठता यादीवरील हरकती आक्षेप गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पुराव्यासह सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या हरकती आक्षेपाची गटशिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या पथकांनी मूळ सेवापुस्तकावरून पडताळणी करतील. आलेल्या सर्व हरकती आक्षेपाचे निराकरण झाल्यानंतर ज्या हरकती आक्षेपाची दुरुस्ती करावयाची आहे. त्यांचे एकत्रिकरण करून २९ जुलैस धुळे प्राथमिक शिक्षण विभाग येथे खास दूतामार्फत कार्यालयीन वेळेत सादर करावे लागणार आहे. बदलीसाठी जिल्ह्यातील एकूण सेवा दहा वर्षे व सध्याच्या शाळेवरील सेवा किमान तीन वर्षे पाहिजे. 

बदलीपात्र शिक्षकांची संख्या 
मराठी माध्यम : ३० 
ऊर्दू माध्यम : ७ 
प्राथमिक शिक्षक संख्या : ६१३ 
पदोन्नती मुख्याध्यापक : ५४ 
ऊर्दू : ३ 

 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule zilha parishad planing teacher transfer oflfine