esakal | ऑफलाइन सभा घेण्याची सूट द्या; जि. प. अध्यक्ष डॉ. रंधेंची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

dhule zilha parishad

जिल्हा परिषदेच्या ५६ सदस्यांसह पंचायत समितीचे सर्व सदस्य, अधिकाऱ्यांचे आयडी तयार करण्यात येत आहेत. नियोजनानुसार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा १८ सप्टेंबरला तर सर्वसाधारण सभा २३ सप्टेंबरला होणार आहे.

ऑफलाइन सभा घेण्याची सूट द्या; जि. प. अध्यक्ष डॉ. रंधेंची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सभा ऑनलाइन घेण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यवस्थेची तयारीदेखील सुरू आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य हे ग्रामीण, दुर्गम भागात राहतात, त्यांना मोबाईल रेंजसह विविध समस्यांमुळे ऑनलाइन सभांमध्ये सहभाग नोंदविणे शक्य नसल्याने प्रत्यक्ष (ऑफलाइन) सभेसाठी सूट द्यावी, परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी शासनाकडे केली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. तसे पत्र २५ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांना झूम अॅपद्वारे सहभागी होता येईल. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ५६ सदस्यांसह पंचायत समितीचे सर्व सदस्य, अधिकाऱ्यांचे आयडी तयार करण्यात येत आहेत. नियोजनानुसार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा १८ सप्टेंबरला तर सर्वसाधारण सभा २३ सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या काही सदस्यांकडे अद्यापही ॲन्ड्रॉईड मोबाइल नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना झूम अॅप व त्याच्या वापराबाबत किती माहिती आहे, याबाबतही प्रश्‍न आहेत. शिवाय आदिवासी भागात मोबाइलला रेंज मिळत नाही. त्यामुळे झूम अॅपद्वारे होणाऱ्या बैठकीत तांत्रिक अडचणी येऊ शकतात. 

डॉ. रंधेंची शासनाकडे मागणी 
ऑनलाइन सभांमध्ये सहभागासाठी अनेक सदस्यांना मोबाईल नेटवर्कसह विविध अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. रंधे यांनी राज्य शासनाकडे ऑफलाइन सभेसाठी सूट द्यावी अशी मागणी केली आहे. ऑफलाइन सभेत फिजिकल डिस्टन्सींगस आवश्‍यक उपाययोजना, नियम पाळू त्यामुळे अशा सभांसाठी सूट देण्याची डॉ. रंधे यांची मागणी आहे. या मागणीवर शासनाकडून काय प्रतिसाद मिळतो त्याकडे लक्ष असेल.

loading image