esakal | धुळे जि.प,पं.स.साठी पोटनिवडणूक; पाच ऑक्टोबरला मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad

धुळे जि.प,पं.स.साठी पोटनिवडणूक; पाच ऑक्टोबरला मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) १५ गट, तर पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) ३० गणांसाठी, अशा एकूण ४५ जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक (By-election) जाहीर केली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असून पाच ऑक्टोबरला मतदान, तर सहा ऑक्टोबरला मतमोजणीसह (Counting of votes) निकाल जाहीर होईल.

हेही वाचा: मुलाचे पार्थिव नेण्यासाठी वृद्ध बाप भिक्षा मागतो तेव्हा..!


कोरोनामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना आहे त्या टप्प्यावर पूर्वी स्थगिती दिली होती. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी निवडणूक आयोगाने पुन्हा कार्यक्रम जाहीर केला. पूर्वी जिल्ह्यातील एकूण ४५ रिक्‍त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलैला मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचा ६ जुलैचा आदेश आणि राज्य शासनाने कोविडमुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलैला त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी ९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे १९ ऑगस्टचे कोविड-१९ संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत.


पोटनिवडणुकीचा कार्यक्रम असा
पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित झाला होता तो आता पुढील प्रक्रियेने सुरू होत आहे. यात २१ सप्टेंबरला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी, २४ सप्टेंबरपर्यंत अपिलाची मुदत, नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २७ सप्टेंबरला नामनिदेशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी २९ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. तसेच पाच ऑक्टोबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान; तर ६ ऑक्टोबरला सकाळी दहापासून मतमोजणी होईल. कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घ्यावी, असेही निर्देश आहेत. या कार्यक्रमामुळे आचारसंहिता लागू झाल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

हेही वाचा: जळगाव जिल्हा कारागृहात महिला कैद्याचा आत्महत्याचा प्रयत्न

धुळे जिल्ह्यात ४५ रिक्त जागा
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर असू नये, असा निर्णय दिल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इतर मागासवर्गीय सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले. त्यानुसार धुळे तालुक्यातील लामकानी, कापडणे, फागणे, नगाव, कुसुंबा, नेर, बोरविहीर, मुकटी, शिरूड, रतनपुरा, बोरकुंड या ११, तर शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, नरडाणा, मालपूर, खलाणे या चार गट, शिरपूर पंचायत समितीच्या अर्थे, विखरण, तऱ्हाडी, वनावल, जातोडा, शिंगावे, करवंद आणि अजनाड या आठ, शिंदखेडा पंचायत समितीच्या दाऊळ, वर्षी, हातनूर, खर्दे, मेथी या पाच, साक्री पंचायत समितीच्या दुसाणे, बळसाणे, घाणेगाव, जैताणे, पिंपळनेर, चिकसे, धाडणे, कासारे, म्हसदी या नऊ, धुळे पंचायत समितीच्या लामकानी, न्याहळोद, फागणे, नेर, सडगाव, बोरविहीर, मुकटी, शिरूड या आठ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

loading image
go to top