esakal | सत्ताधारी भाजपचे ‘सीईओं’शी जुळते; काही अधिकाऱ्यांशी वाद 
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधारी भाजपचे ‘सीईओं’शी जुळते; काही अधिकाऱ्यांशी वाद 

वादग्रस्त फायलींवर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविले.

सत्ताधारी भाजपचे ‘सीईओं’शी जुळते; काही अधिकाऱ्यांशी वाद 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : येथील जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आणि इतर काही अधिकाऱ्यांमध्ये उभी फूट पडली आहे. पूर्वीच दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले असून, आता प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार रडारवर आहेत. शिक्षकांच्या बदल्यांवरून अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी सीईओ वान्मती सी. यांच्याकडे श्री. पवार यांनी तक्रार केली आहे. सत्ताधारी भाजपचे ‘सीईओं’शी चांगले जुळत असताना, इतर अधिकाऱ्यांशी वाद होत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. 

विकासकामे आणि सेस फंडातील रकमेच्या बिलावरून सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, सदस्यांचे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकारी वर्षा घुगरी यांच्यात वाद झाले. त्यातून सौ. घुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. काही वादग्रस्त फायलींवर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविले. मात्र, स्वेच्छारजा घेतल्याचा दोघा अधिकाऱ्यांचा दावा आहे. 

बदली प्रक्रियेला ‘ब्रेक’ 
जिल्हा परिषदेत २१ जुलैला प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २१ शिक्षकांच्या बदली समुपदेशनाची प्रक्रिया झाली. यात नाशिक विभागीय आयुक्तांच्या २७ फेब्रुवारीच्या आदेशाचे पालन न झाल्याने बदली प्रक्रियेस स्थगिती दिली जावी, अशी मागणी अध्यक्ष डॉ. रंधे यांनी केली. विभागीय आयुक्तांचा सोयीनुसार बदल्या व्हाव्यात, असा आदेश आहे. मात्र, शिक्षणाधिकारी पवार यांनी मनमानी कारभार करत काही चुका केल्या. बदल्यांबाबत सकारात्मक किंवा नियमानुसार विचार केला नाही, असा डॉ. रंधे यांचा आक्षेप आहे. त्यामुळे या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. 

शिक्षकांची मागणी काय? 
बदलीपात्र २१ शिक्षक बिगरआदिवासी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना आदिवासी क्षेत्रातील रिक्त जागेवर पदस्थापना हवी आहे. त्यांना ते सोयीचे होणार आहे. मात्र, आदिवासींच्या पेसा क्षेत्रातील रिक्त जागेत आदिवासी शिक्षकांनाच प्राधान्य दिले जावे, अशी मागणी करत या घटकाच्या पुढारी मंडळींनी त्या २१ शिक्षकांच्या पदस्थापनेला विरोध दर्शविला आहे. 


अतिरिक्त कार्यभाराबाबत काय म्हणावे? 
श्री. पवार शिंदखेडा येथे गटशिक्षणाधिकारी होते. त्यांना प्राथमिक शिक्षण विभागाचा प्रभारी कार्यभार सोपविला. माध्यमिक शिक्षणाधिकारी बोरसे रजेवर गेल्यानंतर श्री. पवार यांना माध्यमिकचा प्रभारी कार्यभार सोपविला. नंतर त्यांच्या जागी निरंतर शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांना प्रभारी कार्यभार सोपविला. त्यांच्याविषयी काही तक्रारी असल्याचे कारण पुढे करत आता पुन्हा श्री. पवार यांच्याकडे माध्यमिकचा प्रभारी कार्यभार सोपविला आहे. डॉ. कुवर यांच्याविषयी तक्रारी होत्या, तर त्यांना माध्यमिकचा कार्यभार कसा सोपविला गेला? याबाबत ‘सीईओं’च्या भूमिकेविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली असून, राजकीय हस्तक्षेपामुळे धरसोडीचे धोरण स्वीकारले जात असल्याची चर्चा वर्तुळात आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
loading image
go to top