dhule zp
dhule zp

धुळे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने उघडणार शाळा 

देऊर : जूनमध्ये दर वर्षी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होतो. मात्र, यंदा राज्यासह देशभरात "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विपरित स्थिती निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर शासनाने प्राथमिक, माध्यमिक शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता टप्प्याटप्प्याने प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार असून, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी मार्गदर्शक सूचना, कृती आराखड्यानुसार कार्यवाहीचा आदेश दिला आहे. 

याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा येथील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पालिकांचे मुख्याधिकारी, मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना काल (ता. 17) सायंकाळी पत्र दिले आहे. 

जबाबदारीचे नियोजन असे 
शाळा व्यवस्थापन समित्यांची बैठक घेणे, घरात राहून अथवा ऑनलाइन डिजिटल, ऑफलाइन शिक्षणाचे नियोजन, कन्टेमेंट झोनमधील शाळा सुरू करणे, आगामी काळात प्रत्यक्ष शाळा सुरू करताना शाळा व्यवस्थापन समित्यांची भूमिका, ग्रामपंचायत, पालक, शिक्षक, आरोग्य विभागाची जबाबदारी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका शाळांचे शैक्षणिक कामकाज टप्प्याटप्प्याने पुढे न्यावे लागणार आहे. 

अनेक विभागांवर जबाबदारी 
ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोगातील प्राप्त निधीतून विद्यार्थ्यांसाठी शाळेत साबण, मास्क, सॅनिटायझरची सुविधा पुरवतील. "मनरेगा'अंतर्गत निधी शाळेच्या स्वच्छतेसाठी वापरावा. विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी समन्वय साधावा, शाळांचे निर्जंतुकीकरण करावे. वीज, पाणीपुरवठा, पालकांनी मुलांना घरातून मास्क घालून पाठविणे, पाणी बॉटल, हातरुमाल, चटई देणे, तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावणे, आजारी पाल्यास शाळेत न पाठविणे, आरोग्य विभागाने पाचवी ते दहावीचे वर्ग असणाऱ्या शाळांसाठी फिरते आरोग्य केंद्र कार्यरत ठेवणे, महापालिकांनी अभ्यासक्रम पथदर्शी राबविणे, डिजिटल शिक्षणासाठी तिसरी ते पाचवीसाठी दिवसातून एक तास, सहावी ते आठवीसाठी दोन तास, तर नववी ते बारावीसाठी तीन तासांचा कालावधी ठरविणे आदी जबाबदाऱ्या निश्‍चित करण्यात येत आहेत. 

शाळांचे संभाव्य वेळापत्रक 
शासनाच्या निर्देशांनुसार शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित गावांत एक महिना आधी कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, याची खात्री करून वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे. यात नववी, दहावी, बारावीचे वर्ग असलेल्या शाळा जुलै 2020 पासून, सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळा ऑगस्ट, तर तिसरी ते पाचवीचे वर्ग असलेल्या शाळा सप्टेंबरपासून सुरू होतील. पहिली व दुसरीचे वर्ग असणाऱ्या शाळांबाबत व्यवस्थापन समितीने निर्णय घेऊन त्या सुरू करायच्या आहेत. अकरावीचे वर्ग दहावीच्या निकालाच्या आधारावर सुरू होतील. 

शाळा पूर्वतयारी पंधरवडा 
शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेऊन प्रत्यक्ष, ऑनलाइन, व्हॉट्‌सऍप, व्हीसीद्वारे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, पाठ्यपुस्तक वितरण, स्वच्छता, निर्जंतुकीकरण्याचे प्रयत्न, स्वच्छतागृहांत पाण्याची व्यवस्था, गटागटाने पालकांच्या सभा घेऊन जनजागृती करणे, भीती कमी करणे, बालरक्षक शिक्षकांनी स्थलांतरित मजुरांची मुले, संभाव्य शाळाबाह्य होण्याची शक्‍यता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांची शाळेत येण्याची मानसिकता तयार करणे आदी पूर्वतयारी करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com