निधी देणार नसाल तर ‘स्थगित’ही करू नका 

निखील सुर्यवंशी
Wednesday, 18 November 2020

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना आमदार रावल म्हणाले, की शिंदखेडा तालुक्यात निधी देता येत नसेल, तर मी दिलेल्या निधीला किमान स्थगिती देऊ नये.

दोंडाईचा ः सहकार क्षेत्रात अनेक ठिकाणी अपहार झाले. त्यामुळे हे क्षेत्र बदनाम झाले. मात्र, मालपूरच्या गोपाल दूध उत्पादक संस्थेने दर वर्षी सभासदांना बोनससह अनेक योजना दिल्याने त्यांचे हित जोपासले गेले, असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले. 

वाचा- धुळे जिल्ह्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांचा महाविरोध !

मालपूर (ता. शिंदखेडा) येथे श्री गोपाल दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांना आमदार रावल यांच्या हस्ते दिवाळी बोनस व भेटवस्तू वाटप झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल अध्यक्षस्थानी होते. सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच जगदीश खंडेराव, वर्षा डेअरीचे अध्यक्ष गितेश गोसावी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, चंद्रकला पाटील, शिंदखेडा पंचायत समितीचे उपसभापती नारायण गिरासे, अरुण पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील, पोपट बागूल, गोपाल भारती, गोपाल डेअरीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमसिंग रावल, सदाशिव गोसावी आदी प्रमुख पाहुणे होते. 

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना आमदार रावल म्हणाले, की शिंदखेडा तालुक्यात निधी देता येत नसेल, तर मी दिलेल्या निधीला किमान स्थगिती देऊ नये. अन्यथा सर्वसामान्यांचा विकास खुंटेल. अमरावती मध्यम प्रकल्प तीन ते चार वर्षांनी भरणारा आहे. अमरावती- प्रकाशा योजना शनिमांडळपर्यंत दोन टप्प्यांत माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मार्गी लागली. ती उर्वरित अमरावती प्रकल्पापर्यंत मंत्र्यांबरोबर फोटो काढून छापणाऱ्यांनी पूर्ण करावी. सी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. भटू रावल यांनी आभार मानले. डेअरीचे अध्यक्ष श्रावण अहिरे, उपाध्यक्ष रणछोड भोई, सचिव बारीकराव मोरे, संचालक किसन गोसावी, नामदेव माळी, उत्तम भामरे, नानाभाऊ पानपाटील, सरलाबाई माळी, लताबाई वसईकर, रघुनाथ कोळी, ईश्वर गोसावी, कृष्णा चौधरी, धर्मा भोई, सहसचिव संतोष भोई, मापाडी शिवाजी माळी आदींनी संयोजन केले. 

गोपाल डेअरीतर्फे असा लाभ 
गोपाल संस्था जिल्ह्यातील पहिली संगणकीकृत डेअरी आहे. ती अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. दर वर्षी संस्थेतर्फे दूध उत्पादकांना पोळ्याला प्रतिलिटर एक रुपया बोनस, तर ५० पैसे प्रतिलिटर दिवाळी बोनस देते. यंदा उत्तम श्रीराम भामरे, शरद भगा पाटील, शिवाजी माळी, कृष्णा चौधरी, मोहन भोई या सभासदांना बोनस, तर तुकाराम माळी, मोहन माळी, संदीप गोसावी, नितीन भोई, पंढरीनाथ भोई यांना स्टिलचा दुधाचा कॅन वाटप झाला.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dondaecha MLA Jayakumar Rawal criticizes the government