फागणे ते नवापूर चौपदरीकरणाला ऑक्टोबरचा मुहूर्त 

तुषार देवरे
Thursday, 24 September 2020

म्हात्रे कंपनीने अखेर ९८० कोटी खर्चातून अपूर्ण असलेले काम पूर्णतेसाठी होकार दर्शविला आहे. ईपीसी धर्तीवर या महामार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यासाठी दळणवळण सुविधेला ‘बूस्टर डोस’ या माध्यमातून बळकटी देणारा ठरणार आहे. 
 

देऊर (धुळे) : नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील फागणे ते नवापूर हद्दीपर्यंत १४० किलोमीटरच्या अपूर्ण प्रलंबित कामाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. १ ऑक्टोबरपासून महामार्ग कामाला सुरवात होईल. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने उर्वरित कामाची निविदा काढली. त्यात जे. एम. म्हात्रे कंपनीने अखेर ९८० कोटी खर्चातून अपूर्ण असलेले काम पूर्णतेसाठी होकार दर्शविला आहे. ईपीसी धर्तीवर या महामार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यासाठी दळणवळण सुविधेला ‘बूस्टर डोस’ या माध्यमातून बळकटी देणारा ठरणार आहे. 
दोन वर्षांपासून प्रलंबित अर्धवट कामामुळे हा महामार्ग बहुचर्चित आला आहे. दृष्ट लागलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरण कामावर कोरोनाचा विपरीत परिणाम झाला. अडचणींचे ग्रहण लागलेले चौपदरीकरणाचे काम अथक प्रयत्नाने मार्गी लागत असताना त्याची प्रक्रिया कोरोना, टाळेबंदीमुळे ठप्प झाली होती. परिणामी या कामाला दिरंगाईचा सामना करावा लागला. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामाला कोरोनाचाही फटका बसला आहे. संकटात सापडलेल्या या कामाचा एप्रिलमध्ये नव्याने ‘श्रीगणेशा’ होत असतानाच कोरोनाच्या आपत्तीने काम रखडले. टाळेबंदीत तांत्रिक प्रक्रिया रखडल्याने सुमारे सहा महिने काम लांबणीवर पडले. आता १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होत आहे. 
वन विभागाने कोंडाईबारीसह वनहद्दीतील कामासाठी महामार्ग प्राधिकरणाला वर्किंग परमिशन दिली आहे. त्यामुळे उर्वरित कामाला गती मिळणार आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाने धुळे- चाळीसगाव ट्रॅक, चिंचपाडा, नवापूर रेल्वे अशा तीन गेटसंदर्भात ड्रॉइंगची मंजुरी दिली आहे. यामुळे या रेल्वेपुलावरील काम पूर्ण झाल्यावर रेल्वेगेटचा प्रश्‍न सुटणार आहे. 

आर्थिक फटका सीमेपर्यंत
देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर अर्थपुरवठा करणारी ‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅन्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस’ (आयएलएफएस) ही कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने त्याचा फटका अमरावती ते गुजरातच्या सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणाला बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरण कामामागे पाच वर्षांपासून दृष्टचक्र लागले आहे. मे २०१९ पर्यंत चौपदरीकरण पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे लक्ष्य होते. मात्र वारंवार येणाऱ्या आर्थिक अडचणींच्या ‘ब्रेक’मुळे आता हे काम मुदतीत पूर्ण होणे अशक्य झाले. यातून मार्ग काढत महामार्गाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

महामार्गाची सद्यःस्थिती 
- १४० किलोमीटर ः फागणे ते नवापूर हद्द 
- ८५ किलोमीटर ः चौपदरीकरण पूर्ण 
- ५५ किलोमीटर ः प्रलंबित काम 
- सतरा ः अर्धवट पूल - दीड वर्षापासून निधीचा अडथळा 

चौपदरीकरणाचे काम ‘ईपीसी' तत्त्वावर 
‘ईपीसी’ काय आहे ? (Engineering Procurement and construction) अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि बांधकाम उद्योगातील कराराच्या कराराचा एक प्रमुख प्रकार आहे. सामान्यत: ईपीसी कंत्राटदाराला प्रकल्प वेळ आणि बजेटमध्ये कार्यान्वित करून वितरित करावा लागतो. जो सामान्यत: लंपसम टर्न की (एलएसटीके) करार म्हणून ओळखला जातो. बांधकाम व्यवस्थापनात, परिभाषानुसार खरेदी वेळेवर आणि समाधानकारक मार्गाने बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news fagne navapur highway work start in octomber