भाऊ आढे रेंजच नही तर कर्जमाफी कशी हुईन... 

संजय पाटील
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

सकाळी दहावाजेपासून रेंजच्या शोधात असलेले अधिकारी व शेतकऱ्यात निरुत्साह वाढला. ग्रामपंचायतीनंतर येथील स्वस्त धान्य दुकानात रेंज मिळेल; या आशेपोटी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. परंतु रेंज अभावी शेतकऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागले. 

पारोळा : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभासाठी कराडी (ता. पारोळा) गावाची निवड करण्यात आली होती. परंतु गावात कर्जमाफी संदर्भात बायोमेट्रीक करतांना पोर्टल सुरु करणेसाठी रेंज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तीस वेटींगवर रहावे लागले. परिणामी "भाऊ आढे रेंजच नही; तर कर्जमाफी कशी हुईन...अशीच भावना रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. 

क्‍लिक करा - पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 

शेतकरी कर्जमाफीसाठी पहिल्या टप्यात जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली होती. त्यात कराडी (ता.पारोळा) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे एकुण 160 सभासदांपैकी 82 शेतकरी पात्र ठरेल. तर 70 सभासद हे नियमित कर्जफेड करणारे आहेत. यात 82 शेतकऱ्यांचे दोन लाखाआतील रक्कमेत 64 लाख 26 हजार 275 रुपयाची कर्जमाफी करण्यात येणार आहे. प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात 82 शेतकऱ्यांची यादी लावून त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक जी. एच. पाटील, जिल्हा बॅंक विभागीय व्यवस्थापक सुभाष पाटील, तालुका लेखा परिक्षक योगेश पाटील, लेखा परिक्षक विलास सोनवणे, सहकार अधिकारी सुनिल पाटील, ग्रामसेवक आर. एच. पाटील, सरपंच रतन पाटील, रेशन दुकानदार प्रफुल्ल पाटील, वि.का. सोसा. चेअरमन डिगंबर पाटील, सचिव मधुकर पाटील, सीएससी केंद्र चालक संदीप पाटील, विकास सैंदाणे, तलाठी एस. एल. कोळी, पं.स. संग्रामचे कल्पेश अहीरे यांचेसह शेतकरी उपस्थित होते. 

रेंजसाठी बदलविला घराचा मजला 
कर्जमाफी योजनेसाठी शेतकर्यांच्या हेलफाटे ग्रामपंचायत कार्यालय ते रविंद्र पाटील यांचे घराचा वरचा मजला घेण्यात आला. मुळात गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नसल्याने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आधार बॉंयोमेट्रीक करावे लागत असल्याने सीएससी केंद्र चालकाची दमछाक झाली. सकाळी दहावाजेपासून रेंजच्या शोधात असलेले अधिकारी व शेतकऱ्यात निरुत्साह वाढला. ग्रामपंचायतीनंतर येथील स्वस्त धान्य दुकानात रेंज मिळेल; या आशेपोटी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. परंतु रेंज अभावी शेतकऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागले. 

परिसरात शेतकऱ्यात कही खुशी कही गम 
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर अल्पमुदत पीककर्ज घेतलेल्या दोन लाखाचा आतील शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने काही शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. परंतु नियमित प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे 70 शेतकरी सभासदांनी शासनाकडुन लाभ कधी मिळणार? अशी व्यथा अधिकाऱ्यांकडे मांडली. सदर योजना ही शेतकऱ्यांची धुळफेक करणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

तहसिलदार पोहचले उशिरा 
राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत असतांना तहसिलदार हे दुपारी 12 वाजून 46 मिनीटांनी गावात दाखल झाले. याबाबत शेतकरी यांनी नाराजी व्यक्त करत शेतकरी हा महसुल विभागाचा महत्वपूर्ण घटक असतांना देखील या विभागातील अधिकारी उशिरा येत असल्याने यावेळी सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

शेतीची कामे न करता आपणास कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल.या भावनेपोटी सकाळपासुन अधिकार्यांची प्रतिक्षा केली.परंतु गावात नेटवर्क मिळत नसल्याने उशिरा का होईना लाभ मिळाला.परंतु आर्थिक वर्षात पुन्हा कर्जमिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
- देवचंद वानखेडे, शेतकरी पो. पाटील. 

कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याने आम्ही समाधानी आहे.परंतु गावात रेंज मिळत नसल्याने उतारवयात देखील रांगेत उभे रहावे लागले.गाव विकासाचे वाटचाल करतांना गावात मोबाईल वापरतांना रेंज मिळत नसल्याने शासनाने याबाबत दखल घ्यावी. 
- मुक्ताबाई पाटील, महिला शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer karjmukti yojna parola boimetric not mobile towe range