पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 

पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 

सोनगीर  : चिमठावळ (ता. शिंदखेडा) शिवारातील विहिरीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. तीनपैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता. शेळ्यांना चारा आणण्यासाठी ते तिघेही गेले होते, असे सांगण्यात येते. गौरव लीलाधर जाधव (वय 17), दीपक लीलाधर जाधव (वय 11) व दीपक ज्ञानेश्वर जाधव (वय 15) असे मृत मुलांची नावे आहेत.

चिमठावळ येथील गौरव व दोन्ही दीपक हे तीनजण चारच्या सुमारास गावाजवळील उत्तरेला सुमारे पाचशे मीटरवरील शेतात चारा घेण्यासाठी सायकलवर गेले होते. सायंकाळी सहा वाजून गेले तरी ते परत न आल्याने गौरवचे काका शेतात पाहण्यासाठी गेले असता त्यांना ते दिसून आले नाही; परंतु विहिरीपासून काही अंतरावर शेतात सायकली उभ्या असलेल्या दिसून आल्या. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा पाण्यावर एकाची चप्पल तरंगताना दिसून आली. ते धावतच गावात आले. त्यांनी गौरव व दीपकचे वडील लीलाधरला ही घटना सांगितली. ते ऐकताच मुलाच्या आईने एकच हंबरडा फोडला. लीलाधर व त्याची पत्नी जोरजोरात रडत धावतच शेताकडे पळत सुटले. त्यावेळी गावदरवाजाच्या ओट्यावर बसलेली ग्रामस्थही काय झाले म्हणून शेतात धावत गेले. तेथे पाण्यावर चपला दिसत होत्या; पण मुले दिसत नव्हती. त्यांचे नातेवाईक मनोहर पाटील व नितीन पाटील यांनी विहिरीत उडी घेतली. तेव्हा त्यांच्या पायाला पाण्यात मुले असल्याची जाणीव झाली. त्यांनी एक एक करीत तिघांना बाहेर काढले. तिघांचे मृतदेह पाहताच मुलांच्या दोन्ही मातांनी जोरात हंबरडा फोडला. उपस्थित संपूर्ण गाव सुन्न झाले. तीनही मृत मुलांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन सकाळी करण्यात येणार आहे. अवघा गाव ग्रामीण रुग्णालयात जमा झाला असून, रात्री चूल न पेटल्याने अवघे गाव उपाशी जागरण करीत होते. 

गौरव हा येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत होता. त्याचा लहान भाऊ दीपक येथील आनंदवन माध्यमिक विद्यालयात सहावीचा विद्यार्थी होता. चुलतभाऊ दीपक सोंडले आश्रमशाळेत नववीत शिकत होता. लीलाधर जाधव येथील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असून, दररोज ये-जा करतात. ज्ञानेश्वर जाधव बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली काम करतात. त्यांना एकुलता मुलगा व मुलगी आहे. दोन्ही परिवार गरीब कुटुंबातील आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com