गाढ झोपेत त्या दोघी होत्या...अचानक घडला प्रकार; सुदैवाने वाचल्या 

उमेश काटे
शनिवार, 23 मे 2020

दोन्ही महिला अंगणात झोपल्या होत्या. गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली. मदतीसाठी जिकडेतिकडे पळापळ सुरु झाली.  काही ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अमळनेर : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर कोणतीही नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती जरी आली तरी त्यांचे कोणीही काही ही करू शकत नाही, असाच प्रसंग  गंगापुरी (ता. अमळनेर) येथे एका राहत्या घराची भिंत पहाटे अचानक पडली. "काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती" हेच या अचानक आलेल्या घटनेतुन दिसून आले. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

गंगापूरी येथे शोभाबाई सुखदेव कोळी व  तिरोनाबाई महारु कोळी या दोन्ही महिला अंगणात झोपल्या होत्या. आज (ता. 23) शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक शेजारील घराची जीर्ण भिंत पडली. अचानक या मातीच्या ढिगाऱ्यात त्या दोन्ही महिला गाडल्या गेल्या. गाढ झोपेत असताना अचानक भिंत पडल्याचा आवाज झाल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली. मदतीसाठी जिकडेतिकडे पळापळ सुरु झाली.  काही ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ते देवदूतासारखे धावून येत या दोन्ही महिलांना बाहेर काढले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने चोपडा येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शोभाबाई कोळी यांच्या पाठीच्या मणक्याना जबर मार बसला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, तर तिरोनाबाई कोळी याना मुक्का मार लागला आहे. 

दैव्य बलवत्तर म्हणून वाचले
शनिवारी पहाटे तीन वाजता ज्या जीर्ण झालेल्या घराची भिंत पडली त्या पासून काही अंतरावर  लहान मुले देखील झोपले होते. मात्र सुदैवाने त्या ठिकाणापर्यंत ही झळ पोहचली नाही. त्या लहान मुलांचे अंथरून थोडा लांब अंतरावर असल्याने ते दैव्य बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news gangapuri village women sleep and home wall fell