esakal | न्याय मिळाला, भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल : एकनाथराव खडसे 
sakal

बोलून बातमी शोधा

न्याय मिळाला, भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल : एकनाथराव खडसे 

न्याय मिळाला, भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल : एकनाथराव खडसे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तत्कालीन पालिकेतील विविध गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आपण सुरवातीपासून विधिमंडळ सभागृहात आणि सभागृहाबाहेरही संघर्ष करीत होतो, अखेर न्याय मिळाला. या निकालाने जनतेचा पैसा लाटणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल, असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. 

जळगाव पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने संघर्षाची भूमिका घेणाऱ्या खडसेंना या निकालाबद्दल विचारले असता ते म्हणाले, की 1994 पासून आपण पालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही सातत्याने संघर्ष केला. प्रत्येक प्रकरण कोट्यवधींच्या अपहाराचे होते. शासन स्तरापर्यंत त्याची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न केला. जळगावच्या नागरिकांचा तो पैसा होता. त्यामुळे शहराचा विकास खुंटला, पालिका कर्जबाजारी झाली आणि ठराविक लोकांनी त्यात स्वार्थ साधून ते "गब्बर' झाले. या अत्याचार, अन्यायाविरोधात आपण लढलो, उशिरा का होईना या प्रकरणात यश मिळाले, याचे समाधान आहे. 

नरेंद्र पाटलांचे मोठे योगदान 
घरकुल प्रकरणात न्यायालयीन लढाई लढली, ती लढवय्या नरेंद्र पाटलांनी. आज ते आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी जो संघर्ष केला, तो सर्वश्रुत आहे. त्यांनी एकट्याच्या बळावर ही न्यायालयीन व कायदेशीर लढाई अखेरपर्यंत लढली. फिर्यादी प्रवीण गेडाम, सरकारी वकील, तपासाधिकारी इशू सिंधू यांचेही त्यात मोठे योगदान आहे, असेही खडसे म्हणाले. 

भ्रष्टाचाऱ्यांवर अंकुश 
या निकालामुळे जनतेचा न्यायालयावरील विश्‍वास आणखी दृढ होईल. निकालाचे स्वागत करतानाच अशा निकालांमुळे जनतेचा पैसा लाटणाऱ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर जरब, अंकुश बसेल, असेही खडसे शेवटी म्हणाले.

loading image
go to top