esakal | अमळनेर तालुक्यात 3 हजार ९०० जण 'होम क्वारंटाइन'
sakal

बोलून बातमी शोधा

अमळनेर तालुक्यात 3 हजार ९०० जण 'होम क्वारंटाइन'

होम क्वारंटाइन केलेल्या प्रत्येक नागरिकांवर पुसली न जाणारी शाईचा वापर करण्यात येत असून ती शाई अल्कोहोल युक्त असल्याने अशा नागरिकांना इतर नागरिकांच्या हातावर मारलेल्या शिक्याने कोणताही प्रादुर्भाव होणार नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी दिली.

अमळनेर तालुक्यात 3 हजार ९०० जण 'होम क्वारंटाइन'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे गुजरात व इतर राज्यातून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. बाहेर गावाहून आलेल्या सुमारे ३ हजार ९०० जणांना शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बंगलोरहून आलेला एक जण कोरोना संशयित असून, त्यास धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.


गेल्या काही दिवसांपासून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेऊन नागरिकांना वैद्यकीय पथकामार्फत घरी जाऊन शिक्का मारण्यात येत आहे. शिक्का मारलेल्या नागरिकांना १४ दिवस घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय पथक नेहमी त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे.

तालुका समितीला दक्ष राहण्याच्या सूचना
वरिष्ठ पातळीवरून तालुका पातळीवरील समितीला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका समितीच्या अध्यक्षा प्रांताधिकारी सीमा अहिरे, सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताळे, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, बालविकास प्रकल्प अधिकारी बी. बी. वारूळकर व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. व दररोज आढावा बैठक घेण्यात येत आहे.

फिरणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांवर आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, पालिका कर्मचारी यांच्यातर्फे ३ हजार ९०० जणांना शिक्के मारणे सुरू केले आहे. त्यासाठी न पुसणारी निवडणुकीची शाई वापरण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस त्या व्यक्तीच्या हातावर शिक्का उमटलेला राहील शिक्के मारलेल्या लोकांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सक्त सूचना असून असे लोक बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

होम क्वारंटाइन केलेले नागरिक घराबाहेर सापडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. तालुक्यातील होम क्वारंटाइनवर लक्ष ठेवून आहेत.
- मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर. 

loading image