esakal | माजी मंत्री जैन, आमदार सोनवणेसह 38 आरोपी नाशिकरोड कारागृहात दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

live

माजी मंत्री जैन, आमदार सोनवणेसह 38 आरोपी नाशिकरोड कारागृहात दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड ः जळगावच्या घरकुल घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 38 आरोपींना आज  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणले. यावेळी धुळे पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाच्या ताब्यात दिले. कारागृहात दाखल झालेल्या 38 आरोपींमध्ये दहा महिलांचा समावेश आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह दहा जणांनी प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात जाणे पत्करले. त्यामुळे आज या दहा जणांना आणण्यात आले नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

     धुळे येथून तीन पोलिस व्हॅन जैन यांच्यासह 38 दोषींना घेऊन नाशिकरोडला सकाळी रवाना झाली होती. नाशिकरोड कारागृहाजवळ या व्हॅन दुपारी पावणेचारला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले. यावेळी जैन समर्थकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. नाशिकरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी फक्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आत सोडण्यात येत होते. पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. सर्व आरोपींची बुधवारी (ता.4) कारागृहामधील डॉक्‍टर तपासणी करतील. नंतर त्यांना कैद्यांचा पोषाख व बिल्ला दिला जाणार आहे. तसेच प्रशासन देईल ती कामे देखिल करावी लागणार आहे. इतर कैद्यांना मिळतो तोच नाश्‍ता, जेवण घ्यावे लागेल. चंद्रकांत सोनवणे हे आमदार असल्याने विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याबाबत अहवाल पाठविण्यात येईल, असे कारागृहातील सूत्रांकडून सांगण्यात आले. नाशिकच्या राजकीय वर्तुळात तसेच सामान्य नागरिकांमध्येही जैन यांच्या तुरुंगवारीचीच चर्चा होती. माजी मंत्री जैन यांना नाशिकरोड कारागृहात आणणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून पसरताच त्यांना बघण्यासाठी समर्थकांसह नाशिक शहरातील विविध भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता. कारागृहात सद्यस्थितीला सुमारे तीन हजार कैदी आहेत. त्यात या 38 जणांची भर पडली आहे. 
 

loading image
go to top