#BATTLE FOR NASHIK:जनतेचा जाहीरनामा  प्रक्रिया उद्योगाविना कसमादेत डाळिंबशेतीची पीछेहाट 

गोकुळ खैरनार,मालेगाव
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मालेगाव : डाळिंबावरील तेल्या रोग हद्दपार झाल्याने कसमादेसह नाशिक व धुळे जिल्ह्यांत डाळिंब लागवडीला गेल्या तीन वर्षांत मोठी चालना मिळाली आहे. शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळत असतानाच गुजरात, राजस्थान व तमिळनाडूत डाळिंबाचे पीक वाढले आहे. प्रक्रिया उद्योगच नसल्याने या भागातील डाळिंबाला देशांतर्गत बाजारपेठेत भाव मिळत नाही. गेल्या दहा वर्षांत डाळिंबाचे आगर असलेल्या कसमादेत एकही प्रक्रिया उद्योग झाला नाही. 

मालेगाव : डाळिंबावरील तेल्या रोग हद्दपार झाल्याने कसमादेसह नाशिक व धुळे जिल्ह्यांत डाळिंब लागवडीला गेल्या तीन वर्षांत मोठी चालना मिळाली आहे. शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळत असतानाच गुजरात, राजस्थान व तमिळनाडूत डाळिंबाचे पीक वाढले आहे. प्रक्रिया उद्योगच नसल्याने या भागातील डाळिंबाला देशांतर्गत बाजारपेठेत भाव मिळत नाही. गेल्या दहा वर्षांत डाळिंबाचे आगर असलेल्या कसमादेत एकही प्रक्रिया उद्योग झाला नाही. 

मर व तेल्या रोग तसेच कमी होत असलेले पर्जन्यमान यामुळे हे पीक हेलकावे खात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच फळशेती संकटात आली आहे. प्रयोगशील असलेल्या शेतकऱ्यांनी पेरू, चिकू, मोसंबी, आवळा, बोर, सीताफळ, अंजीर आदींची शेती केली. मात्र डाळिंबाएवढे पैसे कोणतेच पीक देत नाही. तेल्या हद्दपार झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत नाशिक जिल्ह्यात डाळिंबाच्या बागा बहरल्या. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातही लागवड झाली. चार वर्षांपूर्वी झालेल्या लागवडीत पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये धुळ्याचा समावेश होता. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्यावर तसेच टॅंकरच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी बागा जगविल्या. परंतु जेमतेम 40 ते 50 रुपयांपर्यंत किलोला भाव मिळत आहे. 
राज्यातील नाशिक, सोलापूर व नगर या तीन जिल्ह्यांतच डाळिंबाचे बहुतांशी उत्पन्न घेतले जाते. हस्त बहारात डाळिंब शंभरी गाठेल असे वाटत होते. मात्र भाव निम्म्यावर आला. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये 30 ते 35 रुपये किलोने डाळिंब मिळत असल्याने या भागातील डाळिंबाला म्हणावा तसा उठाव नाही. 

ज्यूस युनिटची गरज 

लागवड, फवारणी, जोपासणी, काढणी व बाजारपेठेत डाळिंब नेण्यापर्यंतचा मोठा खर्च येतो. एकीकडे उत्पन्न वाढत असताना दुसरीकडे भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना परराज्यातील व्यापारी व बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागते. डाळिंबावरील ज्यूस युनिट व अनारदाणा हे प्रक्रिया उद्योग कार्यान्वित व्हायला हवेत. दहा वर्षांपूर्वी महालपाटणे (ता. बागलाण) येथे ज्यूस युनिट सुरू झाले होते. मात्र दोन वर्षांतच ते बंद पडले. प्रक्रिया उद्योगासाठी शासन अनुदान देत असले तरी खर्च मोठा आहे. त्यामुळे शेतकरी गटांना बळकटी व सुलभ कर्जपुरवठा करून या उद्योगांना चालना दिली पाहिजे. नाशिक जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र 30 ते 35 हजार हेक्‍टर एवढे आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील डाळिंबाचा दर्जा व गुणवत्ता सरस आहे. निर्यातीसंदर्भातील बदलते धोरण व प्रक्रिया उद्योगांबाबत शासनाची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार डाळिंब कवडीमोल विकावा लागत आहे. विदर्भात संत्र्यावर प्रक्रिया उद्योग उभारले गेले. त्या तुलनेत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कसमादेसह जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाली नाही. 
-ऍडव्होकेट महेश पवार, युवा शेतकरी, पवारवाडी 
 

Web Title: marathi news JAHIRNAMA