esakal | "ऑल दि बेस्ट'.... आजपासून बारावीची परीक्षा

बोलून बातमी शोधा

all the best

"ऑल दि बेस्ट'.... आजपासून बारावीची परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला उद्यापासून (ता. 18) सुरवात होत आहे. या परीक्षेला जिल्हाभरातून 49 हजार 403 विद्यार्थी बसणार आहेत. दरम्यान, यंदा उपद्रवी केंद्रांवर भरारी पथकांची विशेष नजर असणार आहे. 
बारावीची परीक्षा निकोप आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने बारावीच्या परीक्षेसाठी 71 केंद्र ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्रांची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर उपद्रवी केंद्रांवर जिल्ह्यातील सात भरारी पथकांसह तालुकास्तरीय पथकांचीही नजर असणार आहे. 

जिल्ह्यात तेरा केंद्रे उपद्रवी 
जिल्ह्यात 13 उपद्रवी केंद्र आहेत. त्यामध्ये जळगावातील एस. एस. पाटील कला, भाऊसाहेब टी. टी. साळुंखे वाणिज्य व जी. आर. पंडित विज्ञान महाविद्यालय, सिद्धिविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचोली (ता. यावल) येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथील शेठ एम. एम. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कासमपुरामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय, पारोळामधील किसान कनिष्ठ महाविद्यालय, भडगावातील सुमनताई गिरधर पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, भुसावळ येथील डीएल हिंदी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगावातील महात्मा गांधी विद्यालय, चाळीसगावातील जयहिंद माध्यमिक विद्यालय, यावलमधील डॉ झाकीर हुसेन उर्दू महाविद्यालय व सावद्यातील आनंदीबाई हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय या 13 उपद्रवी केंद्रांचा समावेश आहे. 
 
कॉपी आढळल्यास पर्यवेक्षकांवर कारवाई 
एकाच वर्गात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दुसरीकडे परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्‍स दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.