सुखद बातमी : जिल्ह्यातील 21 रुग्ण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

देशासह संपूर्ण जग कोरोनाला लढा देत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असल्याने ही जैविक महामारी म्हणून कोरोनासोबत सर्वच यंत्रणा लढा देत आहे. जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढचत आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढलेली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार देखील सुरु असून आज 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येत्या आठवड्यात आणखी काही रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याची शक्‍यता आहे. 

देशासह संपूर्ण जग कोरोनाला लढा देत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असल्याने ही जैविक महामारी म्हणून कोरोनासोबत सर्वच यंत्रणा लढा देत आहे. जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढचत आहे. आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 174 वर पोहचला असून या कोरोनाग्रस्तांवर कोविड रुग्णालयात उपचार उपचार देखील केले जात आहे. शहरातील कोविड रुग्णालयात आज पर्यंत 43 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत होते. यातील 21 जणांचा आयसोलेशन वार्डातील क्‍वारंटाईन पिरीअड पूर्ण झाला असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 21 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

क्‍वारंटाईन दिवस 14 वरुन 10 वर 
शासनाच्या आदेशानुसार कोविड बाधित रुग्णालया पूर्वी 14 दिवस आयसोलेशन वार्डात दाखल करुन त्याच्यावर उपचार केले जात होते. मात्र शासनाने क्वारंटाईनचे दिवस 14 वरुन 10 इतके केले असून पॉझिटिव्ह रुग्णाला 14 दिवसांऐवजी 10 दिवस रुग्णालयात ठेवले जात आहे. 

आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनामुक्त 
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयात आज पर्यंत 43 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यात अमळनेर मधील 9, भुसावळातील 7 तर जळगावमधील 5 असे एकूण 21 तर यापूर्वी 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 24 वर पोहचली आहे. 

आठवडाभर रहावे लागणार क्‍वारंटाईन 
शासनाच्या नवीन आदेशानुसार पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड रुग्णालयात दहा दिवस उपचार केले जातात. दहा दिवस उपचार झाल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला कोरोनामुक्त घोषीत करुन त्याला घरी सोडले जाते. मात्र या रुग्णाने घरी गेल्यानंतर देखील सुमारे आठवडा भर घरीच क्‍वारंटाईन रहावे लागणार आहे. 
 
कोरोनाची लागण झालेल्यांवर कोविड रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे यशस्वी उपचार केले जात आहे. आज अमळनेर, भुसावळ व जळगावातील 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना टप्प्या टप्प्याने घरी सोडले जात आहे. मात्र या रुग्णांनी आठवडा भर घरी क्‍वारंनटाईन रहावयाचे आहे. तसेच कोरोनाची लागण झाली म्हणून रुग्णांनी घाबरुन जावू न जाता उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल व्हावे. 
- डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (कोविड रुग्णालय) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 21 patient recover corona virus and nigative report