जिल्ह्यातील ग्रामीण भागात "कोरोना'चा शिरकाव, 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे

जळगाव ः जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 56 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनीतील दोन, गेंदालाल मील एक, पवननगर भागातील एक असे चार, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहरातील चार व निंभोरा येथील एक, फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अश्‍या एकूण बावीस रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 232 इतकी झाली असून त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर अठ्ठावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे. शक्‍यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्‍यकता असेल तर घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्‍यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. दिवसातून चार/पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 22 corona patient report positive