लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी 435 बसची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी यात्रोत्सवानिमित्त जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन असून, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्यात 23 एप्रिलला असल्याने दोन दिवसांसाठी विभागातील 435 बसची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जादा बसचे नियोजन यंदा काहीसे कोलमडेल किंवा स्थानिक फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. 

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी यात्रोत्सवानिमित्त जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन असून, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्यात 23 एप्रिलला असल्याने दोन दिवसांसाठी विभागातील 435 बसची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जादा बसचे नियोजन यंदा काहीसे कोलमडेल किंवा स्थानिक फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. 
ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या "एसटी' बस लग्नसराई, दिवाळी या काळात गर्दीने फुल्ल असतात. परंतु या गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जास्त गर्दीच्या मार्गांवर जादा फेऱ्या सुरू केल्या जातात. महामंडळासाठी एप्रिल, मे आणि जून हा उन्हाळी गर्दीचा हंगाम असतो. या हंगामात जळगाव विभागाकडून पुणे, नाशिक, औरंगाबाद, सुरत तसेच स्थानिक पातळीवर लग्नसराईनिमित्त जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठीचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने विभागातून पुण्यासाठी रोज आठ बस, कल्याण, अकलूज व बडोद्यासाठी प्रत्येकी एक आणि सुरतसाठी दोन जादा बसचे नियोजन केले आहे. 

सप्तशृंगी यात्रेसाठी 13 पासून सुरवात 
सप्तशृंगी गडावरील नांदुरी यात्रोत्सव 13 ते 20 एप्रिलदरम्यान आहे. त्यादृष्टीने जळगाव विभागाकडून 250 जादा बसचे नियोजन केले असून, त्याची सुरवात 13 एप्रिलला केली जाणार आहे. अर्थात प्रत्येक आगारातून भाविकांसाठी गाव ते गडापर्यंत बस उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल. 

निवडणुकीसाठी 435 बस 
जळगाव विभागात एकूण 847 बस आणि 22 शिवशाही आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला होणार असून, यात जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी मतपेट्यांची वाहतूक करण्यासाठी 22 व 23 एप्रिल 435 बसची नोंदणी केली जाईल. 22 एप्रिलला सकाळी दहापासून बस मतदान प्रक्रियेसाठी सुपूर्द करून त्या 23 एप्रिलला रात्री मतपेट्या पोहोचवून आगारात परततील. 

फेऱ्यांवर होणार परिणाम 
विभागातील एकूण बसमधील उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी (नांदुरी) यात्रोत्सवासाठी साधारण चारशे जादा बसचे नियोजन आहे. शिवाय मतदान प्रक्रियेत दोन दिवस 435 बस लागणार असून, या काळात स्थानिक फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अर्थात एकूण बसच्या निम्मे बस मतदान प्रक्रियेत अडकणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 435 st bus election bokckong