गैरहजर पोलिसाचा मृतदेह सापडल्याने खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

गोपाळ सोनवणे मुख्यालयात नियुक्तीला असून सतत आठ-नऊ महिन्या पासून गैर हजर होता. दारूचे व्यसन आणि कौटुंबिक त्रासामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडून बडोदा(अहमदाबाद) माहेरी बस्तान मांडल्याची माहिती समोर आली असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव :- पोलिस अधीक्षक कार्यालया शेजारील अधिकारी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारा जवळ सकाळी आठ वाजता पोलिस कर्मचारी गोपाल रामचंद्र सोनवणे (वय-39) याचा मृतदेह आढळून आला. घटनेचे वृत्तकळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. गोपाळ सोनवणे मुख्यालयात नियुक्तीला असून सतत आठ-नऊ महिन्या पासून गैर हजर होता. दारूचे व्यसन आणि कौटुंबिक त्रासामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडून बडोदा(अहमदाबाद) माहेरी बस्तान मांडल्याची माहिती समोर आली असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

वर्ष-2004 मध्ये मुंबईत झालेल्या भरतीत गोपाळ रामचंद्र सोनवणे (वय-39) पोलिदलात भरती झाले होते. जिल्हा बदलीनंतर त्यांनी चाळीसगावात कर्तव्य बजावले, तेथे असतानाच दारूचे व्यसन जडल्याने कौटुंबिक वादात भर पडली. पत्नीने कंटाळून बडोदा(गुजरात) येथे माहेरी बस्तान मांडले होते. त्यानंतर पोलिस मुख्यालयात बदली झाल्यानंतर गेल्या आठ-नऊ महिन्या पासून गोपाळ ड्यूटीवर सतत गैर हजर आहे. व्यसन आणि देखभाल करणारे कोणीही नसल्याने तो, दिवसभर पोलिस अधीक्षक कार्यालय, वसाहत, बसस्टॅण्ड आणि भजेगल्ली येथेच भटकंतीवर राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती दिली. आज सकाळी आठ वाजेपुर्वी त्याला पोलिस वसाहतीत काहींनी बघितले त्यानंतर तो, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवरही दिसून आला. काही वेळानंतर पोलिस अधीक्षक कार्यालया शेजारीच अधिकारी वसाहतीच्या प्रवेशद्वारा जवळ भिंतीला टेकून बसलेल्या अवस्थेत गोपाळ सोनवणेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अकबर पटेल कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. 

मृत्यूचे कारण अस्पष्ट 
मयत गोपाळ सोनवणे यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना मृत्यूची माहिती दिल्यावर चुलत भाऊसह नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. गोपाळला असलेले व्यसन आणि उपाशी पोटी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच समोर येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ; absent police men is deth