खाकी डागाळली : निरीक्षक रणजीत शिरसाठ सह चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

एसआयटीच्या तपासानुसार एमआयडीसी पोलिस निरीक्षकासह जबाब नोंदविलेल्या तिघा कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आर के वाइन्स प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौघांनाही आरोपी करण्यात आले आहे.

जळगाव:  अजिंठा चौफुलीवरील आर. के. वाइन्स्‌ या दुकानातून लॉकडाउनच्या काळात तस्करी होत असल्याचे आढळून आले होते. यात एमआयडीसी पोलिस निरीक्षक रणजित शिरसाट यांची भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले असून विवीध पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी मनोज सुरवाडे, संजय जाधव, जीवन पाटील असे गुन्ह्यात साथीदार असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या एसआयटीच्या चौकशीत निष्पन्न झाले असून चौघांचा दाखल गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणुन समावेश करण्यात आलेला आहे. 

काय आहे नेमके प्रकरण 
लॉकडाउन काळात आर.के.वाइन्स या दुकानाचे सील तोडून तेथून मालाची तस्करी करण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार(ता.12) रोजी पहाटे चार वाजता छापा टाकून (एमएच.18डब्लू9842) या कार मध्ये विविध ब्रॅण्डची दारू भरून निघण्याच्या तयारीत असताना दुकान मालकाचा मुलगा दिनेश राजकुमार नोतवाणी, नितीन श्‍यामराव महाजन, नरेंद्र अशोक भावसार, मॅनेजर गणेश कासार अशा चौघांना ताब्यात घेतले होते. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्नशील मालकाच्या मुलाने अनेकांना संर्पक करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच कारवाईची धुरा सांभाळल्याने राजकीय पुढाऱ्यांचा दबाव येऊनही गुन्ह्याची नोंद झाली होती. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार आर.के.वाइन आणि नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या दोन्ही ठिकाणाचा परवाना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.या सर्व प्रकरणात पोलिस सहभागी असल्याची कुणकूण पोलिस अधीक्षकांना लागल्याने त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेत एसआयडी नियुक्त करून चौकशी चालवली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित दादा शिरसाट, पोलिस कर्मचारी मनोज सुरवाडे, संजय जाधव, जीवन पाटील यांची भागीदारी असल्याचे आढळून आले. प्राप्त पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर रात्री उशिरा या एमआयडीसी पोलिसांत दाखल गुन्ह्यात संशयित म्हणून चौघांच्या नावाचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. 

दबावाला न जुमानता.. 
अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम, यांच्यासह कर्मचाऱ्यांचा या एसआयटीत समावेश होता. एसआयटीच्या तपासानुसार एमआयडीसी पोलिस निरीक्षकासह जबाब नोंदविलेल्या तिघा कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आर के वाइन्स प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौघांनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांवर कारवाई होऊ नये यासाठी अनेक राजकीय लागेबांधे वापरण्यात आले. मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. अखेर गुरुवारी रात्री एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील कलमे.(महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949) चे कलम-81 ,72,75 यासह महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951चे कलम-145(क) 114, 116 असे वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. 

शिरसाट जमा 
गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांना सोपवण्यात आला असून गुन्ह्यात एकूण बारा संशयित निष्पन्न होऊन निरीक्षक रणजित शिरसाट यांच्या कडून एमआयडीसी पोलिस ठाण्याचा पदभार काढण्यात येऊन इतर तीनही कर्मचाऱ्यांना मुख्यालयी जमा क रण्यात येणार आहे. 

असे बारा आरोपी 
नितीन श्‍यामराव महाजन, नरेंद्र अशोक भावसार, दिनेश राजकुमार नोतवाणी, गणेश दिलीप कासार, दिशा दिनेश नोतवाणी, राजकुमार शीतलदास नोतवाणी, सुधा राजकुमार नोतवाणी, यांच्यासह पोलिस निरीक्षक रणजित दादा शिरसाट (वय-55), आदर्शनगर, पोलिस कर्मचारी जीवन काशिनाथ पाटील, संजय जगन्नाथ जाधव(जिल्हापेठ), मनोज केशव सुरवाडे,भारत शांताराम पाटील(तालुका) असे बारा संशयित आरोपींचा समावेश आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Alcohol Smuggling affence Partnership midc police inspector ranjit shirsat rajester agenst