ओली पार्टी' : रम', "रमी'त रंगली पोलिस- वाळूमाफियांची मैफल !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

शहरात काही नागरी वस्त्यांमध्ये तर पोलिसांच्या मोठमोठ्या गाठ्या उभ्या करून कमांडो पथके तैनात असल्याचे चित्र आहे. मंदिरे, मशीद, गुरुद्वारा, चर्च असो, की कुठलेही धार्मिक स्थळ तेथे एकत्र येण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. 

जळगाव  : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन असताना राजकीय वरदहस्त असलेले काही वाळूमाफिया आणि पोलिसांनी मेहरुण तलाव परिसरातील एका शेतात एकत्र येत ब्रॅन्डेड दारूचे पेग रीचवत ओली पार्टी रंगवली. या पार्टीत रमीचा खेळही रंगात आला. या पार्टीची छायाचित्रे व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर सामान्यांसाठीचे लॉकडाउन या माफिया व पोलिसांना लागू नाही का, असा संतप्त प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

क्‍लिक कराःरामानंदनगर परिसरातील रेशनदुकानाचा परवाना रद्द.. 
 

जनसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलिस सध्या सर्वत्र चौका-चौकात उभे आहेत. शहरात काही नागरी वस्त्यांमध्ये तर पोलिसांच्या मोठमोठ्या गाठ्या उभ्या करून कमांडो पथके तैनात असल्याचे चित्र आहे. मंदिरे, मशीद, गुरुद्वारा, चर्च असो, की कुठलेही धार्मिक स्थळ तेथे एकत्र येण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. 

अशी रंगली पार्टी 
या सर्व पार्श्‍वभूमीवर शहरातील मेहरुण तलावाच्या पाठीमागील एका शेतात वाळूमाफियांची मोठी पार्टी बुधवारी (ता. 21) रंगली. या पार्टीला खाकीतील रखवालदार नसेल तर मजा तरी कशी येणार? म्हणून वाळू व्यवसायाशी निगडित पोलिसांनीही पार्टीत हजेरी लावली. पत्त्यांचा डाव... सोबत विदेशी दारूचे पेग आणि सिगारेटचे झुरके सोडत मौजमजा केल्यावर जेवणाचीही सोय येथे करण्यात आली होती. पार्टी आटोपल्यावर संध्याकाळी वाळूमाफियांच्या ग्रुपवरच या "नवाबी' पार्टीचे फोटो व्हायरल झाले अन्‌ चर्चेला ऊत आला. 

आर्वजून पहा : सीसीआय', "जिनर्स' संघर्षात रखडली कापूस खरेदी! 
 

ब्रॅण्डेड दारू आली कोठून ? 
गेल्या 20 मार्चपासून सर्व दारू दुकाने बंद आहेत. तस्करी करणाऱ्या एका मोठ्या डिलरवर गुन्हे शाखेने नुकतीच कारवाई केल्याने ब्लॅकमध्ये दारू विकणाऱ्यांनीही आता आवरते घेतले आहे. अशात मेहरुण शिवारात झालेल्या पार्टीत महागड्या ब्रॅण्डची दारू, बिअर, सिगारेट आदी सहज आणि मुबलक प्रमाणात या लोकांना उपलब्ध झाले तरी कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे आणि हीच बाब लॉकडाउनसाठी आग्रह धरणाऱ्या यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असल्याचे समजले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Alcoholl Party" police and sand mafia held in Mehrun Lake area