पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षाने ढासळली ऐतिहासिक 'शान' 

योगेश महाजन
Thursday, 25 July 2019

अमळनेर ः अमळनेरची ऐतिहासिक ओळख असलेल्या शेकडो वर्षांपूर्वीचा दगडी दरवाजाचा काही भाग बुधवारी (ता. २४) रात्रीच्या मुसळधार पावसाने ढासळला आहे. पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून, याकडे आता तरी डोळे उघडून यांचे संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात असा सूर अमळनेरकरांमधून उमटत आहे. 

अमळनेर ः अमळनेरची ऐतिहासिक ओळख असलेल्या शेकडो वर्षांपूर्वीचा दगडी दरवाजाचा काही भाग बुधवारी (ता. २४) रात्रीच्या मुसळधार पावसाने ढासळला आहे. पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून, याकडे आता तरी डोळे उघडून यांचे संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात असा सूर अमळनेरकरांमधून उमटत आहे. 
अमळनेर शहराचा नावलौकिक म्हणजे संत सखाराम महाराज समाधी, साने गुरुजींची कर्मभूमी, श्री मंगळदेव ग्रह मंदिर तसेच विप्रोच्या मदर प्लान्टमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. तसेच शेकडो वर्षांपूर्वीचा दगडी दरवाजा अमळनेरच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देत आहे. चोपडा, पारोळा, धरणगाव आदी परिसरातून येणारे प्रवासी पैलाड व पुलावरून दगडी दरवाजामार्गाने शहरात प्रवेश करतात. 

अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर 
अमळनेर- चोपडा रस्त्यावरील या दगडी दरवाजा परिसरात दीर्घकाळापासून मोठ्या प्रमाणात काही दुकानदारांचे अतिक्रमण आहे. परिणामी दरवाजासमोरील रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात नेहमीच खोळंबा होत असतो. या पार्श्वभूमीवर ही वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी व ऐतिहासिक दगडी दरवाजाचे संरक्षण व्हावे यासाठी २०१३- १४ मध्ये तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सुमारे ३० कोटींच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव अजूनही लालफितीतच अडकला असून, विद्यमान लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. दरवाजाचा काही भाग कोसळल्याने हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. 

दरवाजा परिसरात संचारबंदी 
काल रात्रीच्या पावसाने दगडी दरवाजाचा एक बुरूज पूर्णपणे ढासळला आहे. दगड व माती रस्त्यावर पडलेली आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नसल्याने वाहतुकीसाठी चिंतेचे सावट आहे. परिणामी या परिसरात तहसीलदार ज्योती देवरे यांनी संचारबंदी लागू केली असून, हा रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन पडलेली माती व दगड हा भराव उचलून विल्हेवाट लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला असून, वाहतूक गांधलीपुरा पुलामार्गे वळविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon amalner history wall