अरब देशात रोज तीन हजार क्विंटल केळीची निर्यात 

live photo
live photo

रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर्षी केळीची निर्यात काहीशी उशिरा म्हणजे मार्चच्या सुरुवातीला सुरू झाली. यंदा नेहमीपेक्षा थंडी जास्त पडल्यामुळे निर्यातक्षम केळीची कापणी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू झाली नव्हती. जास्त थंडीमुळे केळी निसवण्याची म्हणजे कापणीला येण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे कापणी उशिरा सुरू झाली होती. सध्या मात्र जिल्ह्यात आणि तालुक्यात उत्कृष्ट केळी मोठ्या प्रमाणावर कापणीला आली आहे. विदेशात केळी निर्यात करणाऱ्या विविध कंपन्या आणि निर्यातदार व्यापारी जिल्ह्यात आले असून, भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या भागात निर्यातक्षम केळी फारशी शिल्लक नसल्याने खानदेशी केळीला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

रमजान महिन्यामध्ये महत्त्व 
रमजान महिन्यात खजूर आणि केळी खाऊन रोजा सोडण्याचे महत्त्व आहे. रमजान महिना सात मेपासून सुरू होणार असला तरीही अरब देशात केळी पोहोचून ती पिकून बाजारपेठेत येण्यास सुमारे वीस-बावीस दिवस लागतात. या पार्श्वभूमीवर अरब देशांत रमजान महिन्यासाठी केळीची निर्यात सुरू झाली आहे. इराक, इराण, दुबई आणि अफगाणिस्थान येथे ही केळी निर्यात करण्यात येत आहे. तालुक्यातून कंटेनरमध्ये भरून केळी मुंबईला पाठवण्यात येते. तेथून जहाजाद्वारे केळी परदेशात पाठवली जाते. या प्रवासाला १५ ते २० दिवस लागतात. 

दीडशे ते दोनशे रुपये ऑन 
सध्या केळीचे भाव ११२१ रुपये फरक १४ रुपये असे एकूण सुमारे बाराशे रुपये आहेत. मात्र, विदेशात निर्यात होणाऱ्या दर्जेदार केळीला क्विंटलमागे दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे; म्हणजे सुमारे साडेतेरा ते चौदाशे रुपये क्विंटल या भावाने ही केळी विकली जात आहे. सध्या पाकिस्तानमधील केळी निर्यात बंद झाली आहे. ती सुरू असती तर केळीला किमान पंधराशे रुपयांपेक्षा जास्त दर क्विंटलला मिळाला असता, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच केळीचे बाजार समितीमार्फत काढले जाणारे भाव दीड दोनशे रुपयांनी जास्त आहेत; अन्यथा ही निर्यात आणखी वाढू शकते, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण केळी निर्यातीसाठी तिची कापणी, स्वच्छता, पॅकेजिंग, वाहतूक यासाठी प्रति क्विंटलला दोनशे रुपये खर्च येतो. 

श्रीनगर फळबाजाराचा संप 
काश्मीरमधील श्रीनगरजवळच्या पेरिमपोरा या फळांच्या बाजारात २९ एप्रिलपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे. उधमपूर येथील पोलिस काश्मीरमध्ये जाणाऱ्या विविध फळे आणि भाजीपाल्याच्या गाड्यांची अडवणूक करून पैसे मागत असल्याच्या निषेधार्थ हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सध्या उधमपूरजवळ केळीसह विविध फळांच्या आणि भाज्यांच्या तीनशे गाड्या उभ्या असून, त्यामुळे श्रीनगर आणि काश्मीरकडे जाणारी खानदेशी केळीची वाहतूकही जवळपास बंद झाली आहे. 

दररोज पंधरा कंटेनरची निर्यात 
रावेर तालुक्यातून परदेशात निर्यात होणाऱ्या कंटेनरची संख्या पुढीलप्रमाणे- 
- महाजन बनाना एक्स्पोर्ट्स, तांदलवाडी : ४ 
- एकदंत बनाना एक्स्पोर्ट्स, तांदलवाडी : ३ 
- जैन इरिगेशन : १ 
- रूची बनाना एक्स्पोर्ट्स, अटवाडा : १ 
- महाराष्ट्र बनाना, रावेर : १ 
- अन्य निर्यातदार : ३ ते ५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com