esakal | अटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

अटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. 
लेवा भवनात आयोजित श्रद्धांजली सभेस माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, खासदार ए. टी. पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रतिभा शिरसाट आदी उपस्थित होते. प्रारंभी अटलजींच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. 

अटलजींचे जीवन प्रेरणादायी : खडसे 
माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी वाजपेयींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की दिल्लीत आयोजित अटलजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला त्यावेळी त्यांनी स्वत:च्या कविता स्वत: सादर केल्या. हा क्षण आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा आहे. त्यांचे संपूर्ण जीवनच एक राष्ट्रसंपत्ती आहे. 

हिमालयापेक्षाही मोठी उंची ः गुजराथी 
अरुणभाई गुजराथी म्हणाले, की अटबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची आणि आचारांची उंची मोठी होती. त्यांच्या उंचीपुढे हिमालयही खुजा आहे. प्रशासनात असताना कसे वागावे, राजकारण कसे करावे याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या जीवनातून घडविल आहे. शतकातून अशी एकच व्यक्ती निर्माण होत असते. त्यांच्या जीवनातील एखादा गुण आपण अंगीकारला तर जीवनाला आकार मिळेल. 

उत्तुंग व्यक्तिमत्त्व ः जैन 
अशोक जैन म्हणाले, की अटलजी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. ते पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक परिवर्तन करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या कार्यकाळात भारताचा जीडीपी उंचावला. त्यांनी पायाभूत सुविधांनाही प्राधान्य दिले. अत्यंत संयमी पण तुफानी व्यक्तिमत्त्व होते. एवढे मोठेपण असूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते. 

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ः ऍड. पाटील 
ऍड. सदीप पाटील म्हणाले, की विरोधकांनीही त्यांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा, असे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अटलबिहारी वाजपेयी होते. सत्ताधारी असताना विरोधी पक्षांना विश्‍वासात कसे काम करायचे तसेच विरोधी असतानाही सत्ताधारी पक्षाच्या चागल्या कामात कशी मदत करायची, याचा धडा त्यांनी आपल्या वागण्यातून घालून दिला. 
यावेळी माजी खासदार डॉ. गुणंवराव सरोदे, आमदार संजय सावकारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश्‍वर गर्गे, आर.पी.आय.चे अनिल अडकमोल, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, आम आदमी पक्षाचे ईश्‍वर मोरे यांनीही मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, नगरसेवक विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपचे सुनील नेवे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

loading image