जळगाव जिल्ह्यातील भाग जालना विभागाकडे वर्ग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

औरंगाबाद-जळगाव या साधारण 155 किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण औरंगाबादपासून सुरू झाले. औरंगाबाद- सिल्लोड, सिल्लोड- अजिंठा-फर्दापूर व फर्दापूर ते जळगाव असे तीन टप्पे यात येतात. यात जवळपास सिल्लोडपर्यंतच्या कामास चालना मिळाली आहे.

जळगाव : दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणात आता जळगाव जिल्ह्यातील भाग जालना विभागाकडे वर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, त्यामुळे आता या कामाला आणखीच खोडा बसला आहे. आता या कामाच्या पाठपुराव्यासाठी औरंगाबाद सोडून जालन्याच्या चकरा माराव्या लागणार असून, ते जिकरीचे होणार आहे. परिणामी, अत्यंत दुरवस्था झालेल्या या मार्गाचे भाग्य कधी उजळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

औरंगाबाद-जळगाव या साधारण 155 किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण औरंगाबादपासून सुरू झाले. औरंगाबाद- सिल्लोड, सिल्लोड- अजिंठा-फर्दापूर व फर्दापूर ते जळगाव असे तीन टप्पे यात येतात. यात जवळपास सिल्लोडपर्यंतच्या कामास चालना मिळाली आहे. पुढे फर्दापूरपर्यंत जेमतेम काम सुरू आहे तर फर्दापूर ते जळगाव टप्प्यातील रस्त्याची अक्षरश: "वाट' लागली आहे. 

हेही पहा > चौपदरीकरणास अतिक्रमण, शासकिय निवासस्थानांचा खोडा

जळगाव भाग जालन्याकडे 
सुरवातीला संपूर्ण काम औरंगाबाद युनिटकडे असल्याने जळगाव जिल्ह्यातील कामाबाबत औरंगाबाद महामार्ग युनिटकडे पाठपुरावा करता येत होता. अर्थात, त्या पाठपुराव्याचा उपयोग झाला नाही. आता मात्र, या कामातील जळगाव जिल्ह्यातील म्हणजे फर्दापूर- जळगाव हा भाग जालन्याकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे आता या कामासाठी जालना विभागाशी संपर्क ठेवावा लागणार असून, हे अत्यंत जिकरीचे ठरणार आहे. 

चौपदरीकरणास "ग्रहण' 
अजिंठासारखे जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात खरेतर कोणतीही अडचण न येता हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दोन वर्षांत मक्तेदाराचे चुकीचे नियोजन व बांधकाम विभागाच्या औरंगाबाद महामार्ग युनिटच्या अक्षम्य दुर्लक्षाने या कामाची वाट लावली. काम सुरू झाल्यानंतर 80 कोटींत केवळ रस्ता खोदून मुरूम- माती टाकण्यापलीकडे काही झाले नाही. 

गडकरींकडून दखल 
दीड महिन्यापूर्वी रस्त्याच्या अवस्थेची बोंब उठल्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्यासंबंधी सूचना केल्या. महामार्ग विभागाने सबकॉन्ट्रॅक्‍टरकडे पाठपुरावा करत रस्ता किमान वाहतुकीस योग्य (मोटरेबल) करण्याचे काम हाती घेतले. 

लोकप्रतिनिधीही उदासीन 
कामाचे स्वरूप बघता हा भाग जळगाव विभागाकडे वर्ग होणे गरजेचे होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चुकीचे धोरण आणि जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे हा भाग जालन्याकडे वर्ग झाला आहे. विशेष म्हणजे, त्यानंतरही आपले लोकप्रतिनिधी मूग गिळून असल्याने त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aurngabad highway work jalna devision