खड्डेमय रस्त्यांवरून विद्यार्थ्यांना वेळेत पोचविणे ठरतेय आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

रिक्षाची एक बाजू पूर्णपणे ग्रीलने बंद करून दुसऱ्या बाजूला ग्रीलचाच दरवाजा ठेवलेला असतो, त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रही रिक्षात पाहावयास मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आजही पालकवर्ग रिक्षाकडे पाहत आहे. विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक मुलांना सुरक्षेसाठी स्वत:च रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडतात

जळगाव : शहरातील श्रीमंतांपासून तर सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांची वाहतूक रिक्षाचालक करीत असतात. रिक्षावाले काका म्हणजे त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनले आहे. विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत वेळेवर पोचविण्याची जबाबदारी तसेच त्यांना सायंकाळी वेळेवर घरी घेऊन जाण्याचे काम रिक्षाचालकांवर असते. मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या रिक्षामध्ये योग्य त्या उपाययोजना केलेल्या दिसून येतात. मात्र, असे असतानाही शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून विद्यार्थ्यांना वेळेत घेऊन जाणे रिक्षाचालकांसमोर आव्हान ठरत आहे. 

हेपण पहा - दादू, छकुली मला माफ करा...शेतकरी बापाची आत्महत्येपुर्वी चिठ्ठी

मुख्यत्वे करून रिक्षाची एक बाजू पूर्णपणे ग्रीलने बंद करून दुसऱ्या बाजूला ग्रीलचाच दरवाजा ठेवलेला असतो, त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रही रिक्षात पाहावयास मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आजही पालकवर्ग रिक्षाकडे पाहत आहे. विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक मुलांना सुरक्षेसाठी स्वत:च रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडतात तर शाळा सुटल्यावर देखील विद्यार्थ्यांना घरापर्यंत सुरक्षित सोडण्याची जबाबदारीने कार्य करीत असतात. तर शाळेच्या खासगी स्कूलबसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सेवा घरापर्यंत मिळू शकत नसून विद्यार्थ्यांना कधी कधी एक किलोमिटरपर्यंत अंतरापर्यंत पायपीट करावी लागते. 

विद्यार्थ्यांना कुत्र्यांपासून धोका 
आजकाल शहरात भटकणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पाहावयास मिळत असून, याचा लहान मुलांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही पालकांमध्ये भीतीचे वातावरण असूनही मात्र शाळेची विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षावाले काका मात्र विद्यार्थ्यांना या कुत्र्यांपासून सावधानतेने विद्यार्थ्यांना आपल्या घरापर्यंत सोडण्याचे कार्य करीत आहेत. 

रिक्षा बंद करण्याचा घाट 
पुढील शैक्षणिक वर्षापासून शासन विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सध्या रिक्षाचालकांमध्ये सुरू आहे. शासनाने विद्यार्थी वाहतूक बंद केल्यास यात शहरातील रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे रिक्षाचालकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी 
विकास बोरसे (रिक्षाचालक) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे आम्ही रिक्षाची वेळोवेळी दुरुस्ती, देखभाल करीत असतो. मुलांना घरापासून शाळेपर्यंत वाहतूक नियमांचे पालन करत सुरक्षित प्रवास कसा होईल, यावर भर दिला जातो. 

रस्ते सुधारण्याची गरज 
सुनील जाधव (रिक्षाचालक) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जबाबदारीचे भान आम्हाला असते. त्यादृष्टीने रिक्षाचे हुड अगदी मजबूत असून, विद्यार्थी बसण्याचे सीटही चांगले आहे. परंतु खराब रस्त्यांमुळे धुळीने विद्यार्थ्यांना त्रास होऊन श्‍वसनाचे आजार लागण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने शहरातील रस्ते सुधारण्यावर भर दिला पाहिजे. 

पोलिसांचा नाहक त्रास 
ताराचंद पाटील (विद्यार्थी वाहतूक, रिक्षा चालक) : विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी विविध भागतील कॉलन्यांमध्ये जावे लागत असल्याने रस्त्यावरून जाताना पोलिसांचा नाहक त्रास होत असतो. विनाकारण पोलिस विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा अडवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेला उशीर होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon auto riksha student tranceport school