घरी जावून येतो सांगून गेला...तो पाच दिवसाने सापडला...पण मृत अवस्थेत ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

गावातील शिवलाल सोनवणे यांच्या शेतातील सालदार मक्‍याला पाणी सोडण्यासाठी गेला होता. पाणी सोडण्यापुर्वी चाऱ्या बघून घेवून म्हणुन शेताच्या कडेने जात असतांना उर्गदर्प आल्याने सालदाराने जवळ जावुन बघीतले असता त्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्याने मालकाच्या घरी धाव घेतली.

जळगाव ः- भोकर (ता.जळगाव) येथील रोहीत नवल सैंदाणे (वय-11) हा बालक गुरुवार(ता.12 मार्च) रोजी संध्याकाळी 4:30 वाजेनंतर बेपत्ता झाला होता. तालूका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होवुन गेल्या 5 दिवसांपासुन त्याचा शोध सुरु होता. आज सकाळी भोकर गावात तापीनदी पात्रातील लवण-खोऱ्यांमधील शेतात रोहीतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.तालूका पोलिसांत अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहीत नवल सैंदाणे (वय-11) हा गावात गुरुवार(ता.12) रोजी विवाह सोहळा होता, तेथे मित्रांसोबत रोहीत पंगत वाढण्यासाठी हजर होता. घरी जाऊन येतो असे, तो मित्रांना सांगुन गेला तो..परतलाच नाही. गावात सर्वांच्याच परिचयाचा आणि स्वभावाने चंचल असल्याने प्रत्येकच ग्रामस्थ त्याला बऱ्यापैकी ओळखून होता. अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने ग्रामस्थांनी सर्वदुर शोध घेतला मात्र, रोहित मिळून आला नाही. दुसऱ्यादिवशी वडील नवल गुमान सैंदाणे यांनी तालूका पोलिसांत हरवल्याची नोंद केली होती. तेव्हा पासून कुटूंबीय त्याच्या शोधात होते. आज सकाळी गावातील शिवलाल सोनवणे यांच्या शेतातील सालदार मक्‍याला पाणी सोडण्यासाठी गेला होता. पाणी सोडण्यापुर्वी चाऱ्या बघून घेवून म्हणुन शेताच्या कडेने जात असतांना उर्गदर्प आल्याने सालदाराने जवळ जावुन बघीतले असता त्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्याने मालकाच्या घरी धाव घेतली. वामन सोनवणे (शेत करायला घेतलेले मालक)यांनी तत्काळ पोलिस पाटलांना सांगुन तालूका पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेह बेपत्ता रोहित सैंदाणे याचा असल्याची माहिती कळताच अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्यासह श्‍वान, पथक, फॉरेन्सीक टिम घटनास्थळावर दाखल झाली. उपनिरीक्षक निशीकांत जोशी, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह जिल्हारुग्णालयात आणला. संध्याकाळी शवविच्छेदनानंतर कुटूंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला. 

मक्‍याच्या शेतात गैरकृत्य 
वामन सोनवणे यांनी करायला घेतलं शेत तापीच्या खोऱ्यातील लवणांमध्ये आहे. शेताच्या चारही बाजुने टेकड्या(बल्डी) असून टेकडीच्या पायथ्याशी मक्‍याच्या उभ्या पिकात उपडा पडलेल्या अवस्थेत रोहितचा मृतदेह पडून होता. थोड्या लांबवर संडासचा डब्बा, एका बाजूला दुरवर (50मिटर) त्याच्या अंगातील टि-शर्ट पडलेला होता. रोहित सोबत अनैसर्गीक गैरकृत्य केल्याचा प्राथमीक संशय घटनास्थळाच्या परिस्थीतीतून येत होता. 

घटनास्थळावर गाव लोटले 
पाच दिवसापासुन बेपत्ता रोहितचा मृतदेह आढळून आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. एका मागून एक पोलिस गाड्या शेताच्या दिशेने जात असल्याने ग्रामस्थांनीही त्यादिशेने कुच केली. संपुर्ण गाव रोहितचा मृतदेह बघण्यासाठी लोटला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळ प्रतीबंधीत केल्याने उंच टेकड्यांवर उभे राहूनच गावकरी घटनास्थळाकडे टक लावून बघत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhokar village boy Murder