"कोविड'साठी भुसावळचे ट्रोमा सेंटर, चाळीसगावात रुग्णालय : पालकमंत्री पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

अनेक नागरिक "कोरोना'ची लक्षणे असली, तरी वेळेवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत

जळगाव: "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दोन कोटींचा निधी देण्यात आला आहे. सोबतच भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर व चाळीसगाव येथील रुग्णालय लवकरच "कोविड'च्या उपचारासाठी सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

 
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. 

चोपडा, धरणगावला सुविधा 
पालकमंत्री पाटील म्हणाले, की धरणगाव व चोपडा येथील रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयांतील सोयी-सुविधांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी आवश्‍यक त्या सुविधांसाठी सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणात मदत करीत आहेत. जिल्ह्यात "कोरोना'मुळे मृत्यूंची संख्या जरी जास्त असली, तरी मृत्यू झालेल्या रुग्णांना इतरही आजार होते, तसेच अनेक नागरिक "कोरोना'ची लक्षणे असली, तरी वेळेवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. 

केळी विकास महामंडळाचा आग्रह 
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा खरीप हंगामासाठी सज्ज झाली असून, खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात केळी विकास महामंडळाचे मुख्यालय व्हावे यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, "पोखरा'अंतर्गत जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेऊन शेती उपयोगी उपकरणे खरेदी केली आहेत, त्यांना त्याची रक्कम मिळण्याची मागणीही शासनाकडे केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Bhusawal Trauma Center for Kovid, Hospital in Chalisgaon