भाजप.. पार्टी विथ "डिफरन्स'... नव्हे, डिफरन्सेस..! 

सचिन जोशी
Monday, 13 January 2020

शुक्रवारच्या सभेत पक्षाच्या सरचिटणीसाला मारहाण झाली, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यामागे कारण काहीही असो, भाजपसारख्या पक्षात हे प्रकार अलीकडे सर्रास घडताहेत, असे चित्र निर्माण झाले. परवाच्या घटनेत उडालेल्या शाईने म्हणायला नेवेंचे कपडे काळे केले.. ते "ड्राय क्‍लीन'ने धुतलेही जातील.. पण, या घटनेतून धडा घेत सुधारणा केली नाही तर संस्काराचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपच्या चारित्र्यरूपी उपरण्यावर केलेले डाग कुठल्याही डिटर्जंटने धुतले जाणार नाहीत, हे नक्की! 

Party with differenc असे बिरुद मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षात विशेषत: महाराष्ट्रात सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजी व त्यातून थेट सभांमधून होणाऱ्या हाणामाऱ्यांमुळे पक्षाची ही ओळख पुरती धुळीस मिळाल्याचे दिसतेय. जळगावात काल- परवा जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत जो प्रकार घडला तो नेहमीच संस्कारांचे धडे देणाऱ्या या पक्षासाठी लाजीरवाणा असाच आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या वेळी अमळनेरच्या सभेत जी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणीची घटना घडली, त्याच धर्तीवर शुक्रवारीही काहींनी तसा "नजराणा' पेश केला. विशेष म्हणजे, या दोन्ही घटनांचे साक्षीदार होण्याची दुर्दैवी वेळ गिरीश महाजनांवरच आली... मग, हे असेच चित्र दिसतेय तर.. भाजपला party with differences का म्हणू नये? 

"पार्टी विथ डिफरन्स' असलेल्या भाजपतील वाढत चाललेल्या "डिफरन्सेस'चा प्रत्यय शुक्रवारी पुन्हा आला. जळगाव जिल्ह्यात तसा तो गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही अमळनेरच्या सभेतून आला होता. आता हयात नसलेल्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या तत्कालीन दोघा मंत्री व नेत्यांच्या समोर व्यासपीठावरच सादर केलेला हाणामारीचा "अंक' आज आठ-नऊ महिन्यांनंतरही जनतेच्या डोळ्यासमोर आहे. त्यातच शुक्रवारी जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत भुसावळकरांनी तसाच "अंक' सादर करत "डिफरन्सेस'चा प्रत्यय दिला. या अंकात पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवेंना झालेली मारहाण व शाईफेकीने त्यांच्यापेक्षा पक्षाचे आधीच मळत चाललेले कपडे अधिकच काळवंडले. 

हेही पहा - तालुके दत्तक घेवून विकास करणार : गुलाबराव पाटील

निष्ठावंत विरूद्ध आयाराम संघर्ष
सन 2014 मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपने सत्तेचा सोपान गाठला. सत्ता आली की संघटनेत मरगळ येते, त्याचा प्रत्यय गेल्या पाच वर्षांत भाजपमध्येही कमी- अधिक प्रमाणात जाणवला. केंद्र व राज्यातील सत्तेने अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपत "इनकमिंग' झाले. त्यातून निष्ठावंत विरुद्ध आयाराम असा संघर्ष सुरु झाला. संपूर्ण राज्यातच ही स्थिती होती. शिवाय, राज्याचे नेतृत्व फडणवीसांसह ज्यांच्या ताब्यात होते त्यांनी ठिकठिकाणी पक्षातच दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्यास खतपाणी घातले. परिणामी, प्रत्येक जिल्ह्यात अंतर्गत लाथाळ्याही सुरू झाल्या. 

दाग अच्छे है...म्हणून
जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाजन- खडसेंमधील दरी अधिक रुंदावली. पक्षात कधी दिसले नसेल असे गटबाजीचे चित्र याच तीन-चार वर्षांत तीव्रपणे समोर आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जळगाव मतदारसंघातील उमेदवारीच्या घोळातून अमळनेरच्या सभेत थेट व्यासपीठावरच तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी माजी आमदाराला घातलेल्या लाथा उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या.. दोघांमधील हाणामारीतून पक्षाच्या चारित्र्यावर उडालेले डाग खरेतर संबंधितांवरील कठोर कारवाईतून पुसणे आवश्‍यक होते... मात्र "दाग अच्छे लगते है..' म्हणून या गंभीर घटनेकडे श्रेष्ठींनी दुर्लक्ष केले. त्याचाच दुसरा अंक शुक्रवारी जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळी पार पडला.. यावेळीही "संकटमोचक' महाजनच साक्षीदार.. तर, सोबतीला केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेही होते. अमळनेरची सभा असो की, काल-परवाचा प्रकार.. दोन्ही घटना महाजनांसमोर घडल्या. त्यातून महाजनांचा जिल्ह्यातील भाजपवर "वचक' नाही, असाही मेसेज गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP diferace weakly collum nimitt