धक्कादायक...भाजप जिल्हाध्यक्ष जावळेंना ठार मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

गेली 20 ते 25 वर्षे राजकारणात मी सक्रिय आहे. माझे कोणाशीही वैर नाही. कधीही कोणाला साधी शिवीही दिलेली नाही. त्यामुळे ही धमकी कशी आली, हाच प्रश्‍न आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, त्यांच्या सांगण्यावरून आपण फैजपूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे. 
- हरिभाऊ जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष, जळगाव 

 

जळगाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना ठार मारण्याची धमकी मोबाईल मेसेजद्वारे आली आहे. या प्रकरणी त्यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना सकाळी दहा वाजून 41 मिनिटांनी ठार मारण्याचा मोबाईलवर मेसेज आला. दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी जावळे यांनी तो वाचला. इंग्रजीमध्ये असलेल्या या मेसेजमध्ये प्रथम शिवी देण्यात आली असून, त्यात तेहतीस दिवसानंतर तुझा 302 करण्यात येईल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मेसेज टाकण्याऱ्याने आपले नाव व पत्ताही या मेसेजमध्ये दिलेला आहे. जावळे यांच्या 9422780265 या क्रमांकावर 7744888366 या मोबाईल क्रमांकावरून हा मेसेज पाठविण्यात आलेला आहे. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीने आपले नाव राजेंद्र पवार असे लिहिले असून, जळगाव येथील व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल रोड असा पत्ताही दिलेला आहे. या धमकीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस तपास करीत आहेत. 

भाजप जिल्हाध्यक्ष जावळे हे पक्षातर्फे दोन वेळा रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत; तर रावेर व यावल विधानसभा मतदारसंघाचे ते गेल्यावेळी आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. शांत आणि संयमी तसेच अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP district chief threatens to kill haribhau Jawal